top of page

राजकारणात बडव्यांची परंपरा कायम! शिंदे 'विठ्ठल' झाले!

ree

राजकारणातील मुख्य नेत्यालाच आपल्या गराड्यात अडकवून ठेवण्याचे षडयंत्र मोजकेच पदाधिकारी नेहमीच करत असतात. षडयंत्र रचणाऱ्या अशा पदाधिकाऱ्यांना राजकारणात 'बडवे' म्हणून ओळखले जाते. सर्वच राजकीय पक्षात कमी अधिक प्रमाणात 'बडव्यां'चा हा खेळ मागील तीन दशके खुलेआम सुरु आहे. माझ्या 'विठ्ठला'ला  बडव्यांनी घेरले असे म्हणत राज ठाकरे २० वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर  पडले. याच 'बडव्यां'ना कंटाळून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे पासून दूर गेले.  राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार याच 'बडव्यां'च्या गराड्यात अडकल्याने अजित पवार यांना स्वतःची चूल वेगळी करावी लागली.


राजकारणातील ही परंपरा कायम ठेवीत याच 'बडव्यां'नी आता खुद्द एकनाथ शिंदे  यांना गराड्यात अडविले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.  यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे. या असंतोषाचा स्फोट कधी होईल हे 'बडव्यां'च्या गराड्यात अडकलेल्या 'विठ्ठला'लाही समजणार नाही.

 

शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सद्या असंतोषाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.  मुंबई, ठाणे आणि पालघर  जिल्ह्यात या असंतोषाची तीव्रता अधिक दिसत आहे. कारण तोंडावर आलेल्या महापालिका निवडणूका.  या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल का! असा प्रश्न शिंदे शिवसेनेत दाखल झालेल्या २० ते ७० वर्षापर्यंतच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे.  शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी या तिघांची महायुती पाहता सर्वच इच्छुक उमेदवारांच्या इच्छा पूर्ण करणे पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ  शिंदे  यांना शक्य होणार नाही हेही तितकेच खरे आहे.

 

किंबहुना सर्वच इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळेल असे म्हणणेही मूर्खपणाचे ठरेल. यामुळेच  पदाधिकाऱ्याच्या या असंतोषातून मार्ग काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुंबईत २१ सदस्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली आहे.  या समितीत असलेल्याची नावे पाहिली तर राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्यावर बसलेल्या सदस्यांचा यात जास्त भरणा आहे. मुळात या समितीत जे सदस्य आहेत ते सारे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीचे उंबरठे झिजविलेले आहेत. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या घरात जेवण जेवलेले आहेत. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जास्त प्रचार करू शकणारच नाहीत. आणि त्यातूनही केलाच तर तो मुंबईतील मतदारांना मान्य होईल का! हेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे श्रीकांत शिंदे वगळता सारेच सदस्य साठी ओलांडलेले असून सत्तरीकडे झुकलेले आहेत. त्यातच आपापला मतदारसंघ वगळता  अन्य कुठल्याच मतदारसंघात या सदस्यांचा तितकासा प्रभाव नाही.

 

  यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना योग्य  न्याय मिळेल असे सांगणे धाडसाचे ठरेल. आधीच शिंदे यांच्या शिवसेनेत ६० पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे. यात मूळ शिवसेनेत राजकीय कारकीर्द संपलेल्या अनेक नगरसेवकांचा भरणा आहे. तर काहीजणांचा दोन दोन वेळा पराभव झालेला आहे. यामुळे अशा इच्छुक उमेदवारांना पालिका निवडणुकीत उमेदवारी देणे शक्य होणार आहे का ! आणि त्यातूनही उमेदवारी मिळाली तर ते निवडून येतील का! असाही प्रश्न आहे.. तरीही हे सारे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले आहेत. कारण.....

 

'तेरी महफिल मे किस्मत आजमा कर हम भी देखेंगे!'

घडी भर को तेरे नजदिक आकर हम भी देखेंगे!'


या तत्वावार आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम आहे म्हणून मुळीच आलेले नाहीत. काहीजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना कमविलेली मिळकत वाचविण्यासाठी शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत. तर काहीजण नव्याने मिळकत जमविण्यासाठी आलेले आहेत. या साऱ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांना माहित नाही अशातलाही अजिबात भाग नाही. एकनाथ शिंदे हे तळागाळातील कसलेले मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांपासून... पदाधिकाऱ्यापर्यंत  आणि पत्रकारांपासून....IAS अधिकाऱ्यांपर्यंत कोणाला काय पाहिजे! कोणाला कसे मॅनेज करायचे! याचे सखोल ज्ञान, अनुभव  एकनाथ शिंदे यांना आहे.

 

त्यांच्या याच कामगिरीकडे पाहून अनेकजणांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले. उद्धव ठाकरे यांचा हात सोडून शिंदे यांचा हात पकडलेल्या बहुतांश जणांच्या इच्छा विविध मार्गाने शासकीय निधी देऊन एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी पूर्ण केलेल्या आहेत. कारण असंतोषाचे मूळ कारण शिंदे चांगलेच ओळखतात. म्हणूनच कालच्या मुंबईत निर्माण झालेल्या असंतोषानंतर पुन्हा एकदा असंतोष असलेल्या माजी नगरसेवकांना शासकीय निधी वितरित कारण्याचेही निश्चित झाले आहे. त्यांची यादीही तयार झाली आहे.  तरीही मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेत असंतोष संपलेला नाही. किंबहुना तो वाढत चालला आहे. वाढत चाललेल्या या असंतोषामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांपैकी २४ नगरसेवक उद्धव यांच्या शिवसेनेत परत येणार! अशा बातम्या पसरू लागल्या. शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्यामुळेच या बातम्या पसरू लागल्या आहेत.

 

शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता किंवा असंतोष निर्माण  होण्यास दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. एक म्हणजे महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे येणार म्हणून. जर राज आणि उद्धव यांनी एकत्रित येऊन मराठीचा मुद्दा उपस्थित केला तर.. मराठी माणूसच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेला बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाईल.  त्यांना रोखणे कठीण होईल.  ही भीती  शिंदे सेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांना सतावत आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धात मुंबई महापालिकेत शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळतील ही मनात निर्माण झालेली शंका. जर भाजपाने जास्त जागांवर दावा केला तर आपली राजकीय कारकीर्द पणाला लागेल अशीही भीती शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या माजी नगरसेवकांना सतावत आहे.

 

ना प्रवक्ता! ना वक्ता!!

 

 कोणत्या नेत्याला विठ्ठलाचा दर्जा द्यायचा याची कला नेत्याच्या जवळ असलेल्या पदाधिकाऱ्यांना म्हणजेच बडव्यांना चांगलीच असते. हे पदाधिकारी एक एक पावले पुढे टाकीत एक दिवस आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि 'बडवे'गिरी करण्यासाठी मोकळे होतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा बडव्यांची परंपरा फार जुनी आहे. मागील दोन दशकात या परंपरेने जोर धरला. भक्त आणि देवाच्या संभाषणामध्ये मध्यस्थी म्हणून किंवा दुभाषी म्हणून काम कारण्याऱ्या व्यक्तीला विविध नावाने ओळखले जाते. परंतु पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मध्यस्थाची ही भूमिका निभावणाऱ्याना 'बडवे' म्हणून संबोधले जाते.  पुरातन काळापासून याच बडव्यांच्या ताब्यात मंदिराचे व्यवस्थापन असायचे. त्यामुळे मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा!  मंदिरात कोणाला सोडायचे! पूजा कोणी करायची! हे सारे बडवे ठरवत असायचे.  यामुळेच वाद होणे किंवा बडव्याविरोधात तक्रार होणे स्वाभाविकच होते.   तसे पाहिले तर बडव्यांच्या विरोधात असलेला वाद हा आत्ताचा नाही, फार जुना आहे. अगदी संतांच्या काळातील आहे. याबाबत संत चोखोबा यांनी ७०० वर्षांपूर्वी लिहिलेला अभंग आजही प्रसिद्ध आहे. संत चोखोबा म्हणतात....

 

"धाव घाली विठू आता चालू नको मंद!

बडवे मज मारिती ऐसा काही तरी अपराध!!".

संत चोखोबांचा  हा अभंग वाचला तर 'बडवे' तेव्हापासूनच वादात म्हणा किंवा चर्चेत होते असे म्हणावायस हवे. आज या घटनेला ७०० वर्षाचा कालखंड लोटला आहे.. २१ शतकातील २५ वर्षेही उलटली आहेत पण.. आजही बडव्यांचा वचक तितकाच आहे. किंबहुना त्यांनी मंदिरातून बाहेर पडून राजकारणात प्रवेश केला आणि राजकीय पक्षाच्या मुख्य नेत्यांनाच ताब्यात घेऊन त्या नेत्याला 'विठ्ठला'चा दर्जा देण्याचे काम केले आहे असे म्हणावे लागेल. सर्वच राजकीय पक्षात कमी अधिक प्रमाणात या बडव्यांची लागण झालेली दिसून येत आहे. या राजकीय 'विठ्ठला' ची सेवा करण्याची जबाबदारी त्या पक्षाचे पदाधिकारी असणाऱ्या काही बडव्यांनी घेतलेली असते.

 

आणि या बडव्यांकडून सेवा करून घेण्याचाही आनंद म्हणा किंवा सवय या राजकीय 'विठ्ठला' च्या अंगवळणी झालेली असते. त्यामुळे बडवे सांगतील तेच खरे अशी परिस्थिती सर्वच राजकीय पक्षात निर्माण झालेली दिसून येत आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन राजकीय पक्षात बडव्यांची तितकीशी लागण झालेली दिसत नाही.  कारण या दोन्ही पक्षात 'आपण सारे भाऊ भाऊ अर्धा अर्धा पेढा खाऊ'  अशा पद्धतीने सारेच जणांचे वागणे असते. राजकारणाच्या तळागाळातील सर्वांनाच त्यांच्या क्षमतेनुसार कसा लाभ मिळेल हे पाहिले जाते. पण जो राजकीय पक्ष खासगी आहे,  किंवा व्यक्तीसापेक्ष आहे,  अशाच पक्षात प्रथम 'बडवे' निर्माण होतात आणि त्यानंतरच 'विठ्ठल' जन्माला येतो.  एका विशिष्ठ वयानंतर, कारकिर्दीनंतर ही क्रिया प्रक्रिया होते. सद्या याच स्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते अडकलेले आहेत. ठाणे एके ठाणे! आणि ठाणे दुणे ठाणे!! अशीच काहीशी अवस्था एकनाथ शिंदे यांची झालेली आहे.

 

 वास्तविक शिवसेना ही शिंदे यांचीच आहे असा निर्णय जेव्हा निवडणूक आयोगाने दिला त्याचवेळी शिंदे यांना बाळासाहेबांचे  विचार पुढे नेत शिवसेना पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करता आला असता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या असंख्य  शिवसैनिकांना सोबत घेता आले असते. पण शिंदे हे करू शकले नाहीत.  कारण ठाणे एके ठाणे! ते करत राहिले आणि अखेर याच ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना 'विठ्ठल' केले आणि बडव्यांची भूमिका बाजावीत शिंदे यांना ठाण्याच्याच मंदिरात बसवून ठेवले.

 

वास्तविक कोणत्याही व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात मोठे यश मिळवायचे असेल तर त्या व्यक्तीला त्या राज्याच्या किंवा त्या देशाच्या राजधानीत  मुक्काम ठोकावा लागतो. तर आणि तरच त्या व्यक्तीने निवडलेल्या क्षेत्रात यश मिळते. इतिहासाची पाने उलटली तर आजपर्यंत ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या क्षेत्रात उच्च स्थानावर पोहचल्या आहेत त्यांचे वास्तव त्या देशाच्या किंवा राज्याच्या राजधानीतच असल्याचे दिसून येईल. कारण राजधानीमध्ये घडलेल्या घडामोडिंची  दखल सारा देश घेतोच पण त्यांचबरोबर राजधानीत बसून राज्यावर आणि देशावर नजर ठेवता येते. मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे नगरसेवक होते आता आमदार आहेत. पण मुख्यमंत्री होताच त्यांनी मुंबईत मुक्काम ठोकला. हे करत असताना त्यांनी एक महत्वाचे काम केले ते म्हणजे नागपूरच्या पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात ते राहिले नाहीत किंवा अडकले नाहीत.

 

 त्यामुळे फडणवीस यांना 'विठ्ठला' चा दर्जा मिळाला नाही.  परिणामी त्यांच्या बाजूला नागपूरचे 'बडवे'ही जमा झाले नाहीत किंवा जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे राजकारणासंबंधित अनेकांशी फडणवीस निवांत गप्पा करू शकले. म्हणूनच मुंबई महापालिका भाजपा जिंकणार!आणि भाजपाचाच महापौर होणार! असे ठामपणाने ते बोलू शकले. हा सारा आत्मविश्वास त्यांना राजधानी मुंबईनेच मिळवून दिला. या आत्मविश्वासामुळेच राज्याच्या राजकारणात फडणवीस यांना यश मिळालेच पण.. मिळालेल्या याच यशामुळे पंतप्रधान पदासाठी फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. पण.. फडणवीस यांना जे जमले ते शिंदे यांना जमलेच नाही. कारण ठाण्याचे राजकारण त्यांना आडवे आले.  ठाण्यातील  राजकारणात असलेल्या याच बडव्यांच्या गराड्यात एकनाथ शिंदे पुरते अडकले.

 

'जेथे जातो.. तेथे तु माझा सांगाती'  असे म्हणत  ठाण्याच्या राजकारणातील बडव्यांना घेऊन शिंदे फिरत राहिले. इथेच शिंदे यांचे राजकीय गणित चुकले म्हणा किंवा बिगडले म्हणा. यामुळे अडीच वर्षे मुख्यमंत्री आणि मागील वर्षभर उपमुख्यमंत्री पदावर राहूनही एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईवर कब्जा म्हणण्यापेक्षा मुंबईकरांची मनेही जिंकू शकली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले 'ऑऊट देटेड' म्हणजेच क्षमता संपलेले नेते. यामुळेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे जनतेपर्यंत पोहचलीच नाहीत. कारण..ना प्रवक्ता! ना वक्ता!! ना निष्ठा!!!

 

सम्यस्यांची मुंबई

 

मुंबईत आजही अनेक समस्या आहेत आणि भविष्यात ही या समस्या असणार! मुंबई समस्यातून कधीच बाहेर येणार नाही. महत्वाचे म्हणजे मुंबईकरांसमोर या समस्या शिवसेनेनेच निर्माण केलेल्या आहेत.  कारण १९८५ पासून मुंबईच्या विकासाची जबाबदारी शिवसेनेकडे होती.  परंतु विकासाच्या नावाने बोंब होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांची मुंबई बाबतची संकल्पना त्यांच्या अनुयायांनी स्वीकारलीच नाही. यामुळेच १९८५ नंतरच मुंबईच्या अनधिकृत घरांच्या संख्येत अगणित वाढ झालेली दिसून येईल. आणि यांचमुळे मुंबईच्या आराखडाचे नियोजनच बिघडले.  याचाच फटका जुलै २००५ साली मुंबईला बसला.  तीन तास पडलेल्या पावसाने संपूर्ण मुंबई पाण्याखाली बुडाली.

 

 हजारो माणसे मृत्यूमुखी पडली. लाखो कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले. त्यानंतरच मुंबईच्या विकासाला कुठे चालना मिळाली. मागील वीस वर्षे मुंबईचा विकास सुरु आहे.  यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले.  मिठी नदीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले.  मिठी नदीतून मुंबईकरांना जलवाहतूक करता येईल असेही MMRDA  नें सांगून मुंबईकरांच्या ढोपराला गुळ लावले. पण सद्याची मिठी नदीची अवस्था पाहिली तर पुढील वीस वर्षे या नदीतून जलवाहतूक होईल असे सांगणे मूर्खपणाचे ठरेल. विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या याच शिवसेनेत एकनाथ शिंदे नेते होते, ठाण्याचे नगरसेवक होते, आमदार होते आणि याच शिवसेनेच्या ताकतीवर, दबावर ते मुख्यमंत्री झाले. पण जेव्हा बाळासाहेबांच्या मातोश्री बंगल्या पासून एकनाथ शिंदे दूर झाले त्यावेळी अमित शहा यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केले. ही मातोश्रीची ताकत आहे आणि ही राजकारणातील वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदेही हे अमान्य करणार नाही.

 

यामुळेच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा खरोखरच विस्तार करावयाचा असेल तर त्याची सुरुवात मुंबईतून करायला हवी होती.  माझ्या हातात काहीच नाही! आदित्य ठाकरे माझ्या खात्यात हस्तक्षेप करतात! मला निर्णय घेता येत नाही! उद्धव ठाकरे लक्ष घालत नाही त्यांना बडव्यांनी घेरले असे सातत्याने तक्रारीचा पाढा वाचणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईचा विकास करण्याची आणि मुंबईकरांची मने जिंकण्याची संधी मिळाली होती. पण या संधीचा शिंदे योग्य पद्धतीने फायदा घेऊ शकले नाहीत. शिंदे ठाण्यातच राहिले, ठाण्यातच रमले, 'विठ्ठल' होऊन ठाण्यातील बडव्यांच्या गराड्यातच अडकले. त्यांना बाहेर पडताच आले नाही.  माझे 'विठ्ठल' बडव्यांच्या गराड्यात सापडले असा आरोप करत २००६ साली शिवसेनेचे नेते राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे काहीच ऐकत नाही त्यांना  बडव्यांनी घेरले असे म्हणत शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले.  

 

शरद पवार हे आम्हाला विठ्ठलस्थानी आहे परंतु त्यांना बडव्यांनी घेरले...असे सांगत अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. राजकारणात  मागील तीन दशके सुरु असलेली बडव्यांची परंपरा आजही कायम राहिली आहे. हि परंपरा एकनाथ शिंदे यांनी मोडीत काढून ठाण्यातील बडव्यांच्या गराड्यातून स्वतःची सुटका करून घ्यायला हवी आणि महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करायला हवे. यासाठी ठाण्यातील बडव्यांना ठाण्यातच ठेऊन मुंबईत मुक्काम ठोकायला हवा. अशी मुंबईतीलच नाही तर ठाणे भिवंडी, पालघर पासून अनेक जिल्ह्यातील शिवसैनिक, आणि कात्यकर्त्यांची मागणी आहे. तसे जर झाले तर आणि तरच शिंदे यांना मुंबईतील आणि महाराष्ट्रील नागरी समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजू शकतील. केवळ रस्ते ही मुंबईची समस्या नाही.  'जीने से मरने तक' अशा असंख्य समस्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्र अडकलेला आहे.

 

 मुंबई ठाणे महापालिकासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेची कस लागणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेले आहेच आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे गेलेले आहे. यामुळे भाजपाचे काम फत्ते झालेले आहेच. आता २०२९ साली होणाऱ्या 'लोकसभा' आणि 'विधानसभा' निवडणुकांकडे भाजपाने लक्ष केंद्रित केलेले आहे. दोन महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका  हा भविष्याचा पाया आहे. 'शतप्रतिशत' भाजपा या घोषणेला पूर्णत्वाकडे नेणाऱ्या या निवडणुका आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेची गरज  संपलेली आहे. हे सारे पाहता जागा वाटपात शिंदे यांच्या शिवसेनेला किती महत्व दिले जाईल यावर आत्ताच भाष्य करणे चुकीचे ठरेल. येणारी वेळच सारे काही सांगून जाईल.

 

 

सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक,

ज्येष्ठ पत्रकार, मुंबई,

रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५

दूरध्वनी : ८९२८०५५९२७*

Comments


bottom of page