top of page

रुपूर शिवारातील हल्लेखोर बिबट्याचा वनविभागाला गुंगारा आधिवास निश्चिती नाहीच!, ट्रॅप कॅमेरे ‘नो इमेज्’ मोडमध्येच


बीड: बीडच्या रुपूर (ता. शिरुर कासार) शिवारात बुधवारी (दि.21) मणकर्णा शिवराम नेटके वय 55 वर्षे रा. कोळवाडी (ता. शिरुर कासार) यांच्यावर हल्ला करणार्‍या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी अधिवास निश्चितीच्या उद्देशाने वनविभागाकडून घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, हल्ल्यानंतर बिबट्या घटनास्थळाकडे फिरकलाच नाही, त्यामुळे वनविभागाचे ट्रॅप कॅमेर ‘ नो इमेज’ मोडमध्ये राहिल्याने हल्लेखोर बिबट्याने चक्क वनविभागालाच गुंगारा दिल्याचे समोर आले आहे.


रुपूर शिवारात कापुस वेचणी करणार्‍या मणकर्णा शिवराम नेटके यांच्यावर बुधवारी (दि.21 जानेवारी) दुपारी 1:00 च्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला चढवला. मणकर्णा नेटके यांचे धाडस आणि प्रसंगावधानामुळे पुढील हानी टळी असली तरी या हल्ल्यात त्यांच्या हाताला, चेहर्‍यावर आणि मानेवर गंभीर दुखापत झाली होती. प्रसंगी शेतात काम करणार्‍या इतर महिला, शेतकर्‍यांनी तातडीने घटनरास्थळाकडे धाव घेतल्याने बिबट्याने पळ काढला. जखमी अवस्थेत मणकर्णा नेटके यांच्यावर प्रथम शिरुरच्या प्राभमिक आरोग्य केंद्रात व नंतर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.


दरम्यान, रुपूर, कोळवाडी, गोमळवाडा शिवारात आधिच बिबट्याचा वावर निश्चित करण्यात आला होता. त्यातच या हल्ल्यामुळे ग्रामस्थ, शेतकर्‍यांत भितीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात घटनेनंतर परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास धजावत नव्हते. वनविभागाकडून तात्काळ घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली. घटनेच्या माहतीनुसार वनविभागाचे पाटोदा परिक्षेत्र अधिकारी अमोल घोडके, वनपाल श्री. देवगूडे, वनरक्षक एन.के. काकडे यांच्यासह वनमजूरांनी घटनास्थळ गाठून तातडीच्या उपाय योजनांसाठी कार्यवाही केली.


गुरूवारी (दि.22 जानेवारी) वन्यजिव अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठस्यांची खात्री केली. त्यानुसार अढळून आलेले ठसे बिबट्याचेच असल्याचा निर्वाळा देण्यात आला. हल्लेखोर बिबट्यास जेरबंद करण्यासाठी अधिवास निश्चिती महत्वाची असल्याने वन विभागाकडून घटनास्थळ परिसरात दोन ठिकाण निवडून ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले.


ट्रॅप कॅमेर्‍यामध्ये छायाचित्र स्पष्ट झाल्यानंतर पिंजरा लावून हल्लेखोर बिबट्यास जेरबंद करण्यात येणार असल्याचा खुलासा वनविभागाकडून देण्यात आला होता. किमान दोन ते तीन दिवसात बिबट्याचा वावर ट्रॅप कॅमेर्‍यात टिपला जाईल आणि हल्लेखोर बिबट्यास जेरबंद करण्यासाठी उपाय योजना राबवण्यात येतील अशीच काहीशी आशा परिसरातील शेतकरी नागरिकांना होती.


मात्र, सहा दिवसानंतरही ट्रॅप कॅमेरे ‘नो इमेज ’ मोडमध्ये दिसून आल्याने हल्लेखोर बिबट्याच्या चालाखीपूढे वनविभागालाही रिकाम्या हाती परतावे लागले. त्यामुळे रुपूर शिवारातील हल्लेखोर बिबट्याने चक्क वनविभागालाच गुंगारा दिल्याचे समोर आले आहे.


सतर्कतेचे आवाहन : रुपूर परिसरातील हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर हल्लेखोर बिबट्याचा वावर,अधिवास निश्चिती करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बवण्यात आले होते. मात्र, ट्रॅप कॅमेर्‍यात सहा दिवसानंतरही बिबट्याची हालचाल कैद झाली नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही गरजेनुसार करण्यात येणार आहे, तरी तुर्तास नागरिक शेतकरी, महिला शेतकर्‍यांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी. शेतात जाताना हातात काठी घेवून गळ्याभोवती जाड वस्त्र गुंडाळून जावे, काम करत असताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यत आले आहे.

Comments


bottom of page