लष्कराकडून बचाव कार्य वेगाने सुरु, बेपत्ता दोन जन सापडले.
- Navnath Yewale
- Aug 20
- 2 min read

मुखेड: तालुक्यातील मुक्रमाबाद जवळील लेंडी प्रकल्प बाधित क्षेत्रात बुडालेल्या गावात थेट लष्कराकडून बचाव कार्य सुरू असून काल बेपत्ता असलेले हसनाळ येथील दोघेजण आज सापडले आहेत. हसनाळ (पमु) व अन्य बाधित गावात पुरग्रस्ताना मदत कार्य वेगाने सुरू असून भारतीय सैन्याने स्थानिक प्रशासनासोबत मिळून कुटुंबाचे स्थलांतर केले असून प्रभावित नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर व अन्न वितरण केंद्र उभारले असून या कामाने आता वेग घेतला आहे.
लेंडीच्या बुडित क्षेत्रातील हसनाळ(पमु) गावातील मंगळवारी बेपत्ता असलेले पिराजी म्हैसाजी थोटवे व चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा मृतदेह आज सापडला आहे. आता येथील मृतांचा आकडा आता ५ झाला आहे.

मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. १८ ऑगस्ट रोजी मुखेड तालुक्यातील बा-हाळी महसूल मंडळात एकाच दिवशी ३५४.८ मिमी व मुक्रमाबाद मंडळात २०६.८ मिमी इतके विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. आज १९ ऑगस्ट रोजी पुरस्थिती नियंत्रणात आहे.
पुनर्वसित हसनाळ(पमु),रावणगाव, भासवाडी, भिंगोली व या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. रावणगाव येथे अंदाजे २२५ नागरिक पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते त्या सर्व नागरिकांना शोध व बचाव पथकाककडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हसनाळ येथे अंदाजे ८ अडकलेल्या नागरिकांना शोध व बचाव पथकाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज सैन्य दलामार्फत वैद्यकीय शिबिर लावून आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत.

भासवाडी येथील २० नागरिक सुखरूप बाहेर काढण्यात आले. भिंगोली येथील ४९ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तालुक्यात आलेल्या या महापुरामुळे लहान मोठी एकूण ५२ जनावरे दगावली आहेत. मयत व निराधार कुटूंबाची यादी व पंचनामे मदत देण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात येत आहे.
मुखेड तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, अग्नीशमन दल, शीघ्र प्रतिसाद दल व स्थानिक शोध व तत्परतेमुळे जवळपास ३०० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत. सर्व विस्थापित नागरिकांची तात्पुरती निवास, भोजन व वैद्यकीय सुविधा व्यवस्था करण्यात आलेली आहे. देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनूप पाटील व मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव हेसुध्दा घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्य करत आहेत.



Comments