top of page

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार? .. त्या तक्रारींची गृहमंत्रालयाने घेतली दखल; दोन पथकांकडून बीड जिल्हाकारागृहाची झडती

बीड: दिवंगत संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या इतर साथीदार आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट दिले जाते अशी तक्रार खासदार बजरंग सोनवणे, सुप्रिया सुळे, धनंजय देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती.


बीडच्या जिल्हा कारागृहात वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदार आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असून कारागृहातील अधिकारी कर्मचार्‍यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड व्हिडिओ कॉल करत आहे. शिवाय वाल्मिक कराडच्या बराकचे सीसीटीव्ही बंद असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आलं. त्यामुळे वाल्मिक कराड व त्याच्या साथिदारांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची मागणीही खासदार सुप्रिया सुळे, धनंजय देशमुख यांनी केली होती.

गृहमंत्रालयाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून आज शुक्रवारी बीड कारागृहातील या व्हिआयपी ट्रिटमेंट प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे व छत्रपती संभाजीनगर येथून दोन पथकं बीड कारागृहात धडकले.


सकाळी 11:00 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या पथकाने बीड कारागृहात चौकशी करून फोन कॉल्स डिटेल्स, तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्वाची माहिती गोळा केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह हाय- प्रोफाइल कैद्यांना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप होताच प्रशासनात खळबळ उडाली आहे.


कारागृह तपासणीसाठी आलेल्या पथकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत कारागृहाची कसून तपासणी केली धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत वाल्मीक कराडला फोन कॉल्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बेकायदेशीर सुविधा पुरविल्या जात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. यानंतर 10 अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाने कारागृहातील प्रत्येक अभिलेखे, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि व्हिसी डेटा ताब्यात घेतला आहे. दरम्यान, ज्ञाणराधा मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी घोटाळ्यातील सुरेश कुटे, आर्चना कुटे, बबन शिंदे आणि मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या सारखे हाय- प्रोफाइल कैदी बीड कारागृहात आहेत.


बीड कारागृहाचा कारभार आधीच संशयाच्या भोवर्‍यात आहे. सततच्या चौकशीमुळे त्रस्त झालेल्या कारागृह कर्मचार्‍यांना आता अ‍ॅनल फोन, कॅन्टीन आणि बाहेरील मुलाखतींची जबाबदारी घेण्यास थेट नकार दिला आहे. आम्हाला कोणत्याही चौकशीच्या फेर्‍यात अडकायचे नाही, त्यामुळे बिन महत्वाची ड्युटी द्या, असा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतल्याने अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, बीड कारागृहात कैद्यांना राजकीय दबावाखाली व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते, या आरोपांमुळे कारागृहाची आणि प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. माध्यमांमधून प्रसारित होणार्‍या बातम्यांवर प्रभारी कारागृह अधिक्षकांनी दोन दिवसापूर्वी लेखी निवेदन करत कैद्यांना नियमानुसारच सुविधा पुरवल्या जात असल्याचा खुलासा केला होता, आता या पथकाच्या अहवालातून नेमके काय बाहेर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page