top of page

विचार संपले, पातळी घसरली ! मराठी नेते आपापसात भिडले !!

ree

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत  शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. बाळासाहेबांच्या नावाने श्रीखंड खाणारे दोन्ही शिवसेनेतील नेते दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले. विचार संपलेल्या आणि पातळी घसरलेल्या नेत्यांमुळेच हा वाद निर्माण झाला.  मुंबई आमचीच आहे असे सांगणारे मराठी नेते आपापसात भिडल्याने मराठी माणसांच्या अब्रूचे पुरते धिंडवडे निघालेत.  यामुळे रामदास कदम यांची कौतुकाने पाठ थोपटून मुंबईवर हक्क सांगणाऱ्या परप्रांतीयांनी आनंद व्यक्त केला.


आनंद दिघे यांचा फोटो लावण्यापासून सुरु झालेला हा वादाचा प्रवास बाळासाहेबांच्या मृत्यू पर्यंत येऊन पोहचला आणि आता रामदास कदम यांच्या पत्नीला कोणी जाळले! येथे येऊन थांबला आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद आणखी खालच्या पातळीवर जाण्याची अधिक शक्यता आहे.  या वादाचा फायदा कोणाला किती होईल आणि मुंबई कोणाच्या हाती जाईल  हे गलिच्छ राजकारणाला कंटाळलेला मराठी माणूस नक्कीच दाखवून देईल.

 

 

विचार करण्याची क्षमता जेव्हा संपली जाते....तेव्हा आपसूकच पातळी घसरली जाते. त्यानंतर सुरु होतो फक्त आणि फक्त सुडाचा प्रवास. मग तो कुटुंबात असो, मैत्रीत असो,  समाजकारणात असो किंवा राजकारणात असो, असे वाद होतच असतात. बाळासाहेबांच्या नावाने श्रीखंड खाणाऱ्या दोन्ही शिवसेनेत सध्या अशाच घटनानी वाद निर्माण झाला आहे.  वैचारिक पातळी सोडलेले आणि बुद्धी गहाण ठेवलेले बाळासाहेबांच्या शिवसेनेतील मराठी नेते केवळ स्वार्थासाठी आपापसात भिडलेले दिसत आहेत.  मुंबई आमचीच आहे असे सांगणारे  मराठीच नेते आपापसात भिडल्याने मराठी माणसांच्या अब्रूचे राज्यात आणि देशात पुरते धिंडवडे निघाले आहेत.  तसे पाहिले तर हे काही प्रथमच घडले असे नाही. यापूर्वी अनेकदा असे घडले आहे आणि पुढेही घडणार !  यामुळेच स्वतःला बुद्धिवंत म्हणवून घेणारा मराठी माणूस देशात  केवळ चेष्टेचा विषय बनत चालला आहे. 


याच वैचारिक पातळी नसलेल्या आणि बुद्धीचा ठावठिकाणा नसलेल्या नेत्यांच्या हातात मुंबईच्या चाव्या दिल्यामुळेच आज मुंबईची आणि मराठी माणसांची फरफट झाली असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.  मुंबईत विखूरलेला आणि बिथरलेल्या मराठी माणसांना ज्या उद्देशाने  एकत्रित आणण्याचा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्न केला तो उद्देश सफल झाला का! असे आज ६६ वर्षांनी कोणी विचारले तर त्याचे उत्तर एकच असेल की... बाळासाहेबांचा जो उद्देश होता तो नक्कीच सफल झाला नाही. याचे कारण शिवसेना स्थापन करण्यामागे बाळासाहेबांची जी मेहनत आणि प्रगल्भ अशी वैचारिकता होती ती त्यांच्या अनुयायांमध्ये नव्हती.  बाळासाहेबांनी त्यावेळी केलेली ही एक चूक होती.  हो ती चूकच म्हणावी लागेल.  ती चूक म्हणजे वैचारिक पातळी नसलेले आणि बुद्धीचा काहीही संबंध नसलेल्या लोकांच्या हाती  शिवसेनेच्या पक्षांची सूत्रे देण्यात आली. काही काळापुरता बाळासाहेबांचा हा निर्णय योग्य होता.


पण महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार जसजसा वाढत गेला तसतसा वैचारिक क्षमता असलेल्या मराठी माणसांना पक्षात संधी देणे गरजेचे होते. पण तशी प्रकिया किंवा बदल बाळासाहेबांनी केला नाही किंवा त्यानंतर पक्षाची धुरा हाती घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनीही केला नाही. किंबहुना याच वैचारिक पातळी नसलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी तसे होऊ दिले नाही असे म्हटले तर ते योग्य ठरेल.  यामुळे जे व्हायचे ते झाले. याच वैचारिक पातळी सोडलेल्या आणि बुद्धी गहाण ठेवलेल्या बाळासाहेबांच्या अनुयायांनी प्रथम बाळासाहेबानाच आव्हानाची भाषा केली. त्यानंतर याच वैचारिक पातळी सोडलेल्या अनुयायांनी बाळासाहेबांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला.  याचे एकमेव कारण म्हणजे या नेत्यांची असलेली राक्षसी महत्वाकांक्षा. याच राक्षसी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जी काही मिळालेली पदे आणि या पदामुळे जमविलेली माया याबाबत  या नेत्यांचे समाधान झालेच नाही. यामुळेच शिवसेनेत हा वाद आपापसात वाढत गेला. 


बाळासाहेबांच्या दोन्ही शिवसेनेत राक्षसी महत्वाकांक्षा असलेल्या अनुयायांचा अधिक भरणा आजही आहे.  याच अनुयायांच्या राक्षसी महत्वाकांक्षामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांना स्थिरता  नाही आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाही स्थिरता नाही. शिवसेनेचे दोन्ही पक्ष आजच्या दिवशी अस्थिरच आहेत आणि या दोन्ही पक्षांना दाणे टाकून लढविणारे मात्र स्थिर आहेत. कारण या शिवसेनेवर पक्षाच्या प्रमुखांची पकडच राहिलेली दिसत नाही. शिस्त नावाची गोष्टच दोन्ही शिवसेनेत नाही. कारण या पक्षाची स्थापनाचं मुळी रस्त्यावर झालेली आहे. मराठी माणसांच्या हक्कासाठी या शिवसेनेची स्थापना झाली. त्यामुळेच हक्कासाठी रस्त्यावर राडा करण्याचा या पक्षाचा हातखंडा आहे.  बाळासाहेब असेपर्यंत या पक्षावर बाळासाहेबांचे कडवटपणे नियंत्रण होते.   याचे कारण बाळासाहेबांना केवळ शिवसैनिकच नाही तर साराच महाराष्ट्र त्यांना मानत होते.


विरोधी पक्षातील नेतेही त्यांचा शब्द प्रमाण मानत होते. सर्वाना सोबत घेऊन जाणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच वॉर्डबॉय, शिपाई, वॉचमन, पासून रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यापर्यंत साऱ्यानाच बाळासाहेबांनी राजकारणात मोठे केले. त्यांना विविध पदे दिलीत. ज्यांची सायकलवर फिरण्याची क्षमता नव्हती  ते सारे बाळासाहेबांमुळे विमानातून फिरू लागलेत.  'मर्सीडीस' सारख्या गाडयांतून फिरू लागले. तरीही शिवसेनेचा घात झाला. हा सारा घात झाला किंवा केला तो वैचारिक पातळी नसल्यामुळेच.  हिच वैचारिक पातळी नसल्याने राक्षसी महत्वाकांक्षा निर्माण झाली. हिच वैचारिक पातळी नसल्याने आपल्या कुटुंबाच्या पलीकडे या अनुयायांना काहीच दिसले नाही. हिच वैचारिक पातळी नसल्याने ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्याशी ते प्रामाणिक राहू शकले नाहीत.


सर्वात महत्वाचे म्हणजे हिच वैचारिक पातळी नसल्याने जिथे अन्न खाल्ले तिथेच त्यांनी विष्ठा केली.  काल गोरेगावच्या नॅस्को मैदानावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले विधान हा त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. वास्तविक शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिक आणि मराठी माणसांची मेजवानी होती. बाळासाहेबांच्या वैचारिक विचारांचे सोने लुटण्यासाठी मराठी माणूस न चुकता येतं असे. या दसरा मेळाव्याला मी सुद्धा न चुकता चाळीस वर्षे जात होतो. या मेळाव्यातून मराठी माणसांसाठी लढण्याची ऊर्जा मिळत होती. पण मागील चार वर्षात या मेळाव्याची रयाच गेली.


मराठी माणसांच्या या मेळाव्यात फूट पाडण्याचे काम केले गेले. आणि एकनाथ शिंदे यांनी हे काम इमानेइतबारे केले. यामुळे दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटण्याऐवजी मराठी माणसांनी मराठी माणसांचा सूड कसा घ्यायचा याचे धडे मिळू लागले. कालच्या शिंदे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याने तर गलिच्छ पणाची पातळीच ओलांडली ज्या बाळासाहेबांनी ज्यांना राजकारणात उच्च स्थानावर नेले त्याच बाळासाहेबांच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण दसरा मेळाव्यात करण्यात आले. हे सारे अज्ञातपणामुळे घडले असले तरीही या गलिच्छ राजकारणामुळे स्वर्गातील बाळासाहेबांच्या डोळ्यातही पाणी आले असणार!

 

 

आनंद दिघे ते बाळासाहेब.

 

शिवसेनेचे नेते रामदास कदम आरोप करताना म्हणाले की.. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर दोन दिवस पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या हाताचे ठसे घेण्यात आले. इथेच रामदास कदम थांबले नाहीत तर ते असेही म्हणाले की याबाबत तेथे असणाऱ्या डॉक्टरांना विचारा ते सारे काही सांगतील.  विशेष म्हणजे जाहीर सभेत हा आरोप रामदास कदम यांनी केल्यानंतर दुसऱ्याच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कदम म्हणाले की.. केलेल्या विधानाशी मी ठाम आहे. पण मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो असेही ते म्हणाले. तसे पाहिले तर कोणत्याही जाहीर सभेत  बोलण्यापुर्वी काय बोलावे हे राजकीय नेते मनात ठरवत असतात.


ree

त्याशिवाय ते भाषण करूच शकत नाहीत. त्यामुळे बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो असे रामदास कदम यांनी सांगणे तितकेसे योग्य वाटतं नाही. हे सारे ठरवूनच झाले. त्याची सुरुवात ठाण्यातूनच झाली. पंधरा दिवसापूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी केलेले विधान. आनंद दिघे हे एक जिल्हाप्रमुख होते. त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीने लावणे योग्य होणार नाही. बाळासाहेबांचे नाव हळूहळू पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. असे संजय राऊत यांनी जाहीरपणे सांगितले होते. राऊत यांच्या या विधानामुळे ठाण्यात ठिणगी पडली. राऊत यांचा पुतळा जागोजागी जळण्यात आला.


राऊत यांच्या या विधानाचा बदला घेतला जाईल हे तेव्हाच ठरले असावे आणि याची जबाबदारी रामदास कदम यांच्यावर सोपाविण्यात आली असावी. त्यामुळेच एकनाथ शिंदे व्यासपीठावर असताना कदम जाणीवपूर्वक बाळासाहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत विधान करू शकले. ही सभा जर बारकाईने पाहिली तर असे स्पष्ट दिसत आहे की रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं आरोप   व्यासपीठावरीलच नाही तर समोर बसलेल्या बहुसंख्य पदाधिकारी, शिवसैनिकांना कोणालाच तितकेसे रुचलेले, आवडलेले दिसत नाही. या आरोपामुळे व्यासपीठावरील सारेच अचंबित झालेले दिसत आहेत.


याबाबत शिंदे शिवसेनेतील दोन पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच मला दूरध्वनी वरुन फोन करून सांगितले की आमचे उद्धव ठाकरे यांच्याशी वैर नाही. आमचे उद्धव यांच्या शिवसेतील पदाधिकाऱ्यांशी जमले नाही म्हणून आम्ही शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालो. पण काल रामदास कदम जे काही बोलले ते आम्हाला आवडले नाही. पटलेले नाही. हे सारे पाहता रामदास कदम यांनी आत्ताच सावध होणे गरजेचे आहे. रामदास कदम यांना मी फार जवळून ओळखतो. ते कायम आक्रमक भूमिकेत असतात. याच आक्रमक भूमिकेचा कालच्या सभेत त्याचा वापर पक्षाने करून घेतला असे म्हणावे लागेल. कदम यांनी पत्रकार परिषदेत असाही आरोप केला की.. उद्धव ठाकरे यांना साधा समजू नका ते दुसऱ्याच्या  खांद्यावर  बंदूक ठेवून चाप ओढतात. पण येथेही रामदास कदम यांच्या बाबतीत असेच झाले असे  म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण येथेही रामदास कदम यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढण्यात आलेला आहे.


नाहीतर बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्याचे धाडस आणि तेही दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेच नसते. पण धर्मवीर आनंद दिघेचा राग मनात असल्यानेच त्याचे उट्टे येथे काढण्यात आले असे म्हणावे लागेल.  या साऱ्या प्रकरणात रामदास कदम पूर्णतः वादाच्या  चक्रात अडकले जाण्याची जास्त शक्यता आहे. कारण आज जे काही नेते शिंदे यांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर आहेत. ते उद्या त्या व्यासपीठावर असतीलच असे नाहीत. उद्या अमित शहा राजकारणातून दूर झाले की हे सारे नेते शिंदे यांची साथ सोडून पुन्हा उद्धव ठाकरेकडे येण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्याविरोधात  हे नेते काहीच बोलताना दिसत नाहीत. या साऱ्या गोष्टीचा विचार रामदास कदम यांनी केला असता तर काल केलेल्या बाळासाहेबांच्या बाबतीत केलेले विधान कदम यांनी केले नसतं. यामुळे कदम यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली जाणारच पण त्यांचा मुलगा योगेश कदम यांच्याही राजकीय अडचणीत वाढ होण्याची शक्यता  वाढली आहे.


  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार अनिल परब यांनी मागील अधिवेशनात रामदास कदम यांचा डान्स बार आणि खेड मधील वाळू चोरीचा प्रश्न उपस्थित केला होता. पण कालच्या पत्रकार परिषदेत कदम यांच्या पत्नीचा १९९३ साली घडलेल्या घटनेचा  आणि  संशयास्पद झालेल्या पुतण्याच्या आत्महत्याबाबतचा उल्लेख केला आहे. याबाबत आपल्याजवळ साक्षीदार आहेत त्यांनाही आणले जाणार असेही परब यांनी सांगितले आहे. रामदास कदम यांच्या घरातील वैर पाहता अनिल परब यांना साक्षीदार आणणे कठीण होणार नाही. एकंदरीत हे सारे गलिच्छ राजकारण पाहता मराठी  माणसांची या शिवसेनेमुळे खरोखरच प्रगती होईल का असा मराठी माणसांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे.

 

मराठी माणूस आहेच कुठे!

 

राज्यकर्त्यांची ही जी काही आपापसात लढाई सुरु आहे ही काही सामान्यांसाठी नाही. मुंबईतील मराठी माणसांसाठी तर अजिबात नाही. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने ६६ वर्षे लढा दिला. पण या लढ्याचे फलित काय तर मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परप्रांतीय राजकीय नेत्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सामान्य मराठी माणसांचा कार्यक्रम केला. कारण मराठी माणसांना न्याय देण्यासाठी बाळासाहेबांनी ज्या अनुयायांवर जबाबदारी दिली होती त्यांनीच गद्दारी करत परप्रांतीय व्यापाऱ्यांशी संधान बांधले आणि मराठी माणसांना आपसूकच मुंबई बाहेरचा रस्ता दाखविला. १९८५ पासून सुरु झालेला सिलसिला २०२५ पर्यंत अखंड पणे सुरूच आहे.


दोन्ही शिवसेनेतील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी दोन्ही हातानी मुंबई आणि ठाणे लुटले. अगदी मिठी नदीच्या नाल्यातील चिखलही बाळासाहेबांच्या याच अनुयायांनी लुटला.  ही लूट करून स्वतःची प्रॉपर्टी केलीच पण आपल्या नातेवाईकांचीही प्रॉपर्टी केली. त्यावेळी या शिवसेनेच्या नेत्यांना मराठी माणूस दिसला नाही. एखाद्या झोपडपट्टी पुनर्विकास मध्येही त्या झोपडीत राहणाऱ्या गरीब मराठी माणसाला हे नेते वेळेवर न्याय देवू शकलेले नाहीत. यामुळे  मराठी माणूस आपसूकच मुंबई बाहेर फेकला गेला.


आज मुंबईत प्रत्येक महिन्यात दहा ते अकरा हजार घरांची खरेदी केली जात आहेत. या खरेदी करणाऱ्यामध्ये मराठी माणसे किती आहेत. याची आकडेवारी मराठी माणसांचे  कैवारी म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हवी. म्हणजे त्यांना स्वतःलाच समजून येईल की  मराठी माणसांना खरोखरच न्याय मिळत आहे का! जर महिन्याला दहा ते अकरा हजार घरांची विक्री होत असतील आणि यात मराठी माणसांची संख्या केवळ पाच दहा टक्के असेल तर पुढील पाच वर्षात मराठी माणसांची मुंबईत काय परिस्थिती असेल हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.


मुंबईतील घराच्या विक्रीत झालेली वाढ समोर ठेवूनच मुंबईचा विकासाचा वेग वाढविण्यात आलेला आहे.  मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात वीणले जात आहे.  महापालिकेच्या पैशावर कोस्टल रोड बोरिवली गोराई पर्यंत होत आहे. प्रति तास ३२०किमी ने धावणारी बुलेट ट्रेन लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.  नवी मुंबईचे विमानतळ लवकरच सेवेत दाखल होईल. बोरिवली ठाणे आणि दिंडोशी मुलुंड हे भुयारी मार्ग तयार होत आहे. सारे काही २०२९ पर्यंत तयार होईल. हे सारे होईपर्यंत मुंबईत असलेला मराठी माणूस आणखी बाहेर फेकला जाईल आणि मराठी माणसांसाठी लढणारे सारेच नेते आलिशान टॉवरमधील इमारतीत मराठी माणूस आळशी कसा आहे.


त्याला मेहनत करायला नको अशा गोष्टी सांगत असतील. बाळासाहेबांच्या अनुयायांचे हे चित्र पाहता महापालिका उद्धव यांच्या हाती येवो किंवा शिंदे फडणवीस यांच्या हाती येवो मराठी माणसाच्या जीवनात काहीच फरक पडणार नाही. मागील तीस वर्षे उद्धव ठाकरे यांच्या हातात महापालिका होती आणि त्यावेळी काल शिंदे यांच्या व्यासपीठावर बसलेले मुंबईचे सारेच नेते उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. तरीही माणसांची प्रगती झालीच नाही तर आता काय होईल हा मराठी माणसांचा प्रश्न आहे  याचे उत्तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे देवू शकतील का!

 

 

सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक,

संपादक, 'वृत्तमानस' मुंबई,

रविवार दि. ०४ ऑक्टोबर २०२५

दूरध्वनी : ८९२८०५५९२७*

Comments


bottom of page