व्हिडिओ व्हायरल: मंत्री शिरसाटांचा पाय आणखी खोलात?
- Navnath Yewale
- Jul 11
- 2 min read
समोर पैशाची बॅग, सिगारेट ओढताना मंत्री - राऊतांचा दावा
ते माझं घर, बॅग पैशाची नाही कपड्याची, मला गुंतवण्याचं षडयंत्र - मंत्री शिरसाट

छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेल प्रकरणात मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप होत असतानाच त्यांना थेट आयकर विभागाची नोटीस आली आहे. शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस म्हणजे शिंदे गटाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल.शिरसाटांनी छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमातच आपल्याला आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली.
दरम्यान, सन 2019 ते 2024 मधील संपत्तीमध्ये मोठी तफावत आढळल्याने आयकर विभागाने यावर स्पष्टीकरण मागितले आहे. शिवाय त्याची चौकशी होण्याची देखील शक्यता आहे. आडचीणींचा ससेमिरा पाठीमागे असतानाच संजय राऊतांनी शिरसाटांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिरसाट हे बेडरूममध्ये बसलेले दिसत असून तिथे पैशांनी भरलेली बॅग आहे. ते बेडवर बनियानवर बसून फोनवर बोलत आहेत. यावेळी बॅगच्या शेजारी एक कुत्रा बसलेला दिसत आहे. व्हायरल व्हिडीओवरून आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट व शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हीच नाही तर सर्व देशाने मान्य केलं आहे की, पन्नास खोके एकदम ओके, आता पन्नास पैकी एक खोकं दिसलं असेल आज, गँगचे नेते ‘भ्रष्टनाथ बिंदे’ कारवाई करणार काय? असा उपरोधक टोला लावत त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले.
व्हारल व्हिडीओ प्रकरणी शिरसाटांनी स्पष्ट सांगितले की, हा व्हिडीओ माझ्या बेडरूममधील आहे. मी कुठूनतरी प्रवासातून आलोय आणि बेडवर बसलो आहे. माझ्या बाजूला ज्या बॅग आहेत, त्या कपड्यांच्या असून प्रवासातून आल्याने त्या तशा पडलेल्या आहेत. पैशांच्या बॅग मी आलमार्यांमध्ये ठेवल्या नसत्या का? याचा अर्थ स्पष्ट आहे की, मी प्रवासातून आलोय आणि त्या बॅग पडलेल्या आहेत. हा बेडरूममधील व्हिडीओ नेमका व्हायरल कसा झाला? हे सांगताना संजय शिरसाट म्हणाले की, माझे घर काही मातोश्री 2 नाही. माझ्याकडे कोणालाही चिठ्ठी देऊन आत बोलावले जात नाही. नाव काय, काम काय हे सर्व विचारले जात नाही. कार्यकर्त्याच्या भूमिकेत आम्ही असतो. त्यामुळे हा व्हिडीओ कोणी काढला असेल आणि गेला जरी असेल.. त्यामध्ये गैर काहीच नाही.
गैरसमजाचे काही कारण नाही, यांचे व्हिडीओ पाहा.. तुम्ही महिलांचे छळ करता, ते पाहा अगोदर आमच्या बॅगा कशाला बघता.. म्हणून मला या व्हिडीओबद्दलचे आश्चर्य वाटण्याचे काहीही एक कारण नाही. जणूनबुजून असे लोक टार्गेट करतात. त्यांना माहिती आहे की, मी उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. प्रवासातून आलेली बॅग दरवाज्याजवळ पडलेली असल्याचंही मंत्री संजय शिरसाट वारंवार म्हणाले.



Comments