संजय गायकवाड यांना अखेर उपरती: प्रकाशकांची माफी पण भूमिकेवर ठाम ...आमदार रोहित पवार आंबी परिवारासह पोलिस ठाण्यात
- Navnath Yewale
- 23 hours ago
- 3 min read

बुलढाणा/कोल्हापूर: शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळीनंतर अखेर आमदार संजय गायकवाड यांना उपरती झाली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणात प्रशांत आंबी यांना दिलेल्या शिवीगाळसाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर घेतलेल्या आक्षेपावर ते अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराजांचे नाव सन्मानजनक घ्यावे, त्यांचे नाव एकेरी करून करोडो हिंदूंच्या दैवतांच्या दैवतांचा अपमान करू नये असेही आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून पुन्हा महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संयज गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या शिवीगाळ प्रकरणावरून संताप व्यक्त होत होता. समाजमाध्यमात यावरून संजय गायकवाड यांच्या शिवराळ भाषेवरून टीकेची झोड उठली होती. या व्हिडिओवरुन वादंग उठल्यानंतर आज आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करण्याच्या मतावर आपण ठाम असल्याचंही संजय गायकवाड म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे करोडो देशवासियांचं दैवत आहे, त्यांचा कुठेही उल्लेख करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला जातो. छत्रपती शिवरायांविषयी निष्ठा आणि सन्मान कायम ठेवत संबंधितांनी योग्य ती दुरुस्ती करावी, ज्यांनी बुलढाण्यात येऊन हे पुस्तक वाचायचे आहे, त्यांनी ते वाचावे पण एकेरी उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख करावा. महाराजांचा अपमान करून करोडो हिंदूंचा अपमान करू नये अशी अपेक्षा सुद्धा गायकवाड यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. रोज सार्वजनिक शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करणार असून संजय गायकवाड यांच्यावर गुन्हादाखल झाला नाही तर 28 एप्रिल रोजी संजय गायकवाड यांच्या घरावर सर्व पुरोगामी संघटना मोर्चा काढणार असल्याचे सुभाष लांडे यावेळी म्हणाले.
आमदार रोहित पवार पोलिस ठाण्यात : आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार राजारामपुरी पोलीस स्टेशनला ठाणमांडून होते.
प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांना पत्नी, आईवर शिवीगाळ करत त्यांनाही धमकी दिली आहे. हे बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही. सामान्य कुटुंबातील प्रशांत यांना संजय गायकवाड यांनी पानसरेचं जसं केलं तसं तुझं आम्ही करू अशा प्रकारची धमकी दिली आहे. त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले आणि आमची तक्रार घ्या अशी विनंती केली. प्रशांतसह त्यांच्या आई, पत्नी व पानसरे परिवारातील सर्वांनी ही विनंती केली, पण दुर्दैव असं आहे की काल ती एफआयर झाली नाही , आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजन इथं आलो.
पोलिस स्टेशनला यांच्याबरोबर आल्यानंतर आम्ही पोलिसांना विनंती केली तब्बल एक, दीड तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियासह इथं असणार्या लोकांचा दबाव यासह महाराष्ट्रातील सामान्यांचा प्रशांतला पाठिंबा देत आहेत त्या सर्व दबावामुळे आता हे पोलिस एफआयर घेत आहेत. ज्या प्रकारे प्रशांत आंबी यांना पाहिजे तशाच प्रकारचा ते एफआयआर घेत आहेत. अजित दादांच्या एफआयआरच्या बाबतीत कीती उशीर झाला किती अडचणी आल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक पोलिस स्टेशनला जाऊन देखील तिथं एफआयआर होत नाही म्हणून आम्हाला कर्नाटकात जावं लागलं मग आता उपमुख्यमंत्र्यांच्याच एफआयआरची अशी परिस्थिती असेल तर अशा सामान्य व्यक्तीची काय? असा दबाव आणुन अशा सामान्य लोकांना दाबलं जात असेल, तर उद्या कुठलाही व्यक्ती पुढे येणार नाही,सोशल मीडियावर कोणीही व्यक्त होणार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी या पुस्तकाबद्दल सुरुवातील शंका आल्याचे सांगत इतिहासाचे अभ्यासकांशी संवाद साधून पुस्तक वाचले तेव्हा या पुस्तकाचा हेतू लक्षात आला.
याशिवाय महापुरुषांच्या ज्या आदरयुक्त बिरुदूनामावल्या दिल्या आहेत त्या आदराच्याच आहेत आणि त्याचा आदर आहे. पण जवळच्या व्यक्तीचा उल्लेख हा एकेरी भाषेत केला जातो, विठोबा, ज्योतिबा, खंडोबा यासह वाल्मिकी रामायनाचे उदाहरण देत त्यांनी प्रभू श्रीरामांचाही या ग्रंथात एकेरी उल्लेख आहे तो आदर, जिव्हाळा आणि प्रेमाचा असल्याचेही रोहित पवार म्हणाले. यावेळी पोलिसांनी मार्गदर्शन मागवले असून लवकरच एफआयआर करण्याचे ठाणे प्रमुखांनी अश्वासन दिल्याचेही रोहित पवार म्हणाले यावेळी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यासह त्यांचा परिवार, पानसरे प्रेमी व विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments