छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला- आमदार रोहित पवार
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

आपल्या आगळ्या वेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आज नागपूरात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत. नागपूर येथील भारतदुर्गा शक्तिस्थ शिलान्यास कार्यक्रमात बोतना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले, “ युद्ध करताना महाराज थकले होते, त्यांनी आपला मुकूट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांतीची इच्छा व्यक्त केली होती” असा अजब दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला. विशेष म्हणजे ज्या व्यासपीठावर संरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्याच ठिकाणी हे वक्तव्य केल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगताना दावा केला की, “ शिवरायांनी थकल्यामुळे राजपाट सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यावर रामदास स्वामींनी ते मुकूट पुन्हा महराजांच्या डोक्यावर ठेवून , ‘ हे राज्य माझे आहे आणि तुला फक्त त्याचे संचालन करायचे आहे, असे सांगितले” इतिहासाचा कोणताही आधार नसलेले हे विधान समोर आल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींमधून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वीही तुकोबाराय आणि ज्ञाणेश्वर माऊलींबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणार्या धीरेंद्र शास्त्री यांनी आता थेट शिवछत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पावित्रा घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “ शिवराय थकले होते, असे म्हणणारा हा भोंदू महाराष्ट्रात पुन्हा दिसता कामा नये, ” अशा शब्दांत त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. “ छत्रपतींचा अवमान होत असताना राज्यातील बडे नेते त्या व्यासपीठावर असतानाही शांत कसे बसले?” असा सवाल करत, बागेश्वर बाबावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
आदार रोहित पवारांचे ट्विट: “ शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकार्यांनी जद्गगुरू संत तुकोबाराय, संत ज्ञाणेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दु:ख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणार्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही माहागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘ सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा, हे आता शिवप्रेमी जनता आणि सया सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणार्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं.



Comments