सहस्त्रकुंड धबधब्याच्या पाण्यात आडकलेल्या सात जणांचे यशस्वी रेस्क्यू जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव कार्य पथकाच्या तत्पर्तेने वाचले महिला बालकांचे प्राण
- Navnath Yewale
- Nov 13, 2025
- 2 min read

नांदेड : सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये आज दुपारी पाण्याच्या प्रवाहात उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील 4 महिला व 3 मुले असे एकूण 7 जण अडकले होते. नांदेड जिल्हा प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य राखून तात्काळ शोध व बचावकार्य राबवून सर्वांना रेस्क्यू केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट जेनिथ दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुर्हे यांच्या समन्वयातुन ही कार्यवाही करण्यात आली.
किनवट (जि.नांदेड) तालुक्यातील मौजे वाळकी इस्लापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये आज दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास 4 महिला व 3 मुले असे एकूण 7 जण सहस्त्रकुंड धबधबा पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे समजुन मुरळीतांडाकडे जात होते.
यावेळी त्यांना मंदीराजवळील काही लोकांनी पाण्यात जाऊ नका असे सांगितले पण त्यांनी आम्ही येथीलच असून नेहमी जात असतो असे सांगून त्या महिला पाण्यात गेल्या परंतु पुढे जात असतांना पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्या पाण्यातच अडकल्या व मदत मागण्यासाठी आरडा- ओरड करू लागल्या. तेथील सुरज भर्दे व इतर युवकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दुरध्वनीद्वारे माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ वायरलेसवर पोलिस व किनवट तहसीलदार यांना कळविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या वायरलेच्या माहितीनुसार तालुका प्रशासन तात्काळ शोध व बचाव कार्यास लागले. दरम्यान प्रसंगाचे गांभीर्य राखून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जलसिंचन विभागास सोडलेले पाणी बंद करण्याचे आदेश दिले. तसेच शासनाकडे हेलीकॉप्टरची मागणीही केली.
त्यानुसार स्थानिक शोध व बचाव पथकाद्वारे तेथील भोई समाजातील तडफदार युवकांनी तहसीलदार शारदा चौंडेकर व सहाय्यक पोलिस निरिक्षक उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य यशस्वी राबवून सात जणांची सुखरुप सुटका केली. दुपारी 3:15 च्या दरम्यान घटनेची माहिती मिळताच अवघ्या दोन तासात शोध व बचाव कार्य केल्याने सायंकाळी 5: 15 सर्व महिला व बालकांना यशस्वीरित्या रेस्क्यू केले. यामध्ये अनुसयाबाई दिगंबर ताळमवार वय 45 वर्षे गजराबाई शिवाजी काठेवाड वय 45 वर्षे, सुवर्णा ज्योतीराम गांधरवाड वय 32 वर्षे, पूजा दिगांबर ताळमवार वय 19 वर्षे, कोमल शिवाजी काठेवाड वय 17 वर्षे, कामिनी ज्योतीराम गांधरवाड 4 वर्षे, विघ्नेश ज्योतीराम गांधरवाड 1 वर्षे असे रेस्क्यू केलेल्या महिला बालकांचे नावे आहेत. यांना वाहत्या पाण्याच्या प्रवाहातुन धबधब्यातुन सुखरुप बाहेर काढण्यात आले.
शोध व बचाव कार्याच्या पथकामध्ये भोई समाजाचे पांडुरंग जळबाजी नागीलवाड, दत्ता माधव चोपलवाड, अनिल शंकर भट्टेवार, रामराव सायबु घट्टलवार, दत्ता विठ्ठल विठ्ठलवार, सुनिल शंकर भट्टेवार यांनी सहभाग घेतला.



Comments