सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीक्षेपात ‘ रिंग रोड’ भूसंपादानाच्या कामाला वेग; शेतकर्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा दृष्टिपथात ठेवून नाशिक 'रिंग रोड' प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठीच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत 'रिंग रोड'चे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले.
भूसंपादनासदर्भातील सर्व प्रश्न तातडीने निकाली काढावेत. जिथे राष्ट्रीय महामार्ग आणि 'रिंग रोड'चे आरेखन सोबतच येत असेल, तेथे एकच रस्ता ठेवावा. स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार गुणांक देण्यात यावा. त्यानुसारच भूसंपादनाचा मोबदला अदा करावा. ' रिंग रोड'च्या जवळील जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराबाबत प्राप्त झालेल्या अनेक तक्रारींच्या अनुषंगाने अशा खरेदी विक्री व्यवहारांची संपूर्ण चौकशी करावी.
रिंग रोडचे भूसंपादन करताना जेथे बागायती जमीन असूनही जिरायती जमिनीचे दर दिले असतील अशा ठिकाणी तातडीने बागायती जमिनीचे दर लागू करावेत त्यानुसारच शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या स्थितीत असलेल्या रस्त्याचा दर्जा वाढ करून त्यामध्ये रुंदी वाढल्यास शेतकऱ्यांना
भूसंपादित करून मोबदला द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार देवयानी फरांदे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, आमदार राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अपर मुख्यn सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भातील सादरीकरण केले.



Comments