top of page

सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी; सरकारला खणखणीत इशारा

12 hours ago
2 min read

अंतरवाली : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी (दि.11) अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सरकारला गर्भीत इशारा दिला.


आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांच्यशी चर्चा केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी स्टेजवरुनच माध्यमांशी संवाद साधला दिपके म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे मनोज सरांना हात लावला तर महाराष्ट्र इथं येईल. दरम्यान, दिपके यांच्या या इशार्‍याने आता आंदोलनाला अधिक धार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिपके यांनी सरकारवर सडकून टीका केली. तुम्ही कितीही दिवस बसून राहा , सरकारला काही फरक पडत नाही, असेही ते जरांगे यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने म्हणाले.


हे सरकार इतकं निर्दयी आहे की त्यांना काही फरक पडत नाही, एक माणूस इथं उपोषणाला बसला आहे. तो स्वत:साठी उपोषणाला बसलेला नाही. समाजातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. रोजगार भेटावा, यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं असतं, रोजगार दिला असता तर यांना काय गरज पडली असती उपोषणाला बसायची? असा सवाल सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विचारला.

हे सरकारचं अपयश आहे. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून देण्यात आलं होतं. लोकांची जी कामं करून देण्यासाठी निवडून देण्यात आलं होतं.


ते तुम्ही केलेलं नाही. लोकांना तूम्ही वार्‍यावर सोडलं आहे. काल प्रथमेश देशमुख यांच्या घरी मी गेलो होतो. 27 वर्षांचा मुलगा अडीच लाखांच्या उधारीसाठी आत्महत्या करतो. या मुलांनी आत्महत्या करू नयेत. त्यांना सवलती मिळाव्यात त्यांना रोजगार मिळावे यासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत ना. ते प्रथमेश सारख्या मुलांनी आत्महत्या करू नये यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. मग ज्यांना आपण निवडून दिले, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करत आहेत. तुमचे मुलं शिकून तुम्ही परदेशात पाठवता.


इथं या ग्रामीण भागातील मुलांचं काय, त्यांच्यासाठी धड चांगल्या शाळा नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शहरात शिक्षण घेताना अडचण येते. या मुलांनी करायचं काय? असा सवाल दिपके यांनी केला. सरकारला माझी विनंती आहे की, जरांगे पाटील यांच्या उपोशणाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत. सोनम वांगचूक हे दिल्लीत उपोषणाला बसले होते.


सरकारने त्यांना 26 दिवस उपाशी ठेवलं होतं. तुम्हाला जरांगे पाटील यांच्यासोबतही तसंच करायचं का? तुम्ही यांनाही 26 दिवस उपाशी ठेवणार आहेत का? का इतका वेळ लागत आहे. इथं येऊन बोलायला सरकारला काय अडचण आहे? जे समाजासाठी झटत आहे त्यांच्या सोबत सरकार बोलायला तयार नाही. कॉमेडियनला बोलावून त्याला बिस्कीट द्यायला तयार आहे. असा टोलाही अभिजीत दिपके यांनी लगावला.

Comments


bottom of page