स्वप्नील व विरेंद्र ठाकूर यांची कलाकृती ठरली आकर्षण
- Navnath Yewale
- 4 days ago
- 1 min read
गणेशोत्सवात महालक्ष्मी यात्रेचा देखावा उजळला

डहाणू : गणेशोत्सव हा भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा होणारा सण, या पावन पर्वात प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना होत असून आकर्षक सजावट व देखाव्यांनी भक्तांचे मन मोहून टाकले आहे. डहाणू तालुक्यातील नरपड ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी येथे कै. गोविंद हरी ठाकूर समाज मंदिर मंडळातर्फे उभारण्यात आलेला देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
या मंडळाने सात दिवसांच्या गणेशोत्सवासाठी उभारलेल्या देखाव्यात डहाणू तालुक्यातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी माता मंदिर, विवळवेढे येथे चैत्र शुद्ध पौर्णिमेला भरविण्यात येणाऱ्या महालक्ष्मी यात्रेचे व परिसराचे हुबेहूब चित्रण केले आहे. यात्रेत दिसणारे आकाशपाळणा, चक्री, मौत का कुआ, जहाज पाळणा यांसारखे खेळण्याचे उपक्रम, मंदिर परिसर, डोंगर-दऱ्या, नदी, झाडे, गावातील लोकवस्ती व घरे यांचे वास्तवदर्शी चित्रण या देखाव्यात करण्यात आले आहे. दर्शनार्थी भाविकांनी हा देखावा पाहताना जणू ते प्रत्यक्ष महालक्ष्मी यात्रेतच सहभागी झाले असल्याचा अनुभव व्यक्त केला आहे.
गडाकडे जाणारा प्रवेशद्वार, मुसळ्या डोंगराचा माथा व त्यावरील झेंडा, मंदिर व मंदिराचे प्रवेशद्वार यांचे सूक्ष्म रेखाटन करण्यात आले आहे. यात्रेत दिसणाऱ्या कारवीपासून उभारलेल्या झोपड्या, दुकाने, संगीताचे सूर व ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा देखील या कलाकृतीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे यात्रेचे वातावरण अगदी प्रत्यक्ष उभे राहिल्याचा भास होतो. या देखाव्याची खरी वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूरवाडीतील स्वप्नील ठाकूर व विरेंद्र ठाकूर या तरुणांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून उभारला आहे.
सायकलच्या गोलाकार लोखंडी रिंगांपासून आकाशपाळणा तयार करून त्याला रंगीबेरंगी दिव्यांची सजावट देण्यात आली आहे. तसेच, लाकडांच्या सहाय्याने ‘मौत का कुआ’तयार करून त्यामध्ये लहान दुचाकी आणि कार फिरताना दिसतात. हे दृश्य पाहून भाविक थक्क होत आहेत. या अद्वितीय व आकर्षक कलाकृतीमुळे ठाकूरवाडीतील गणेशोत्सवाला विशेष ओळख मिळाली आहे. भाविकांसोबतच सर्व स्तरांतून या तरुणांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कल्पकतेमुळे व परिश्रमामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला असून परिसरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येत आहे.
Comments