महाराष्ट्र हादरला: बीडमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीणीवर प्राध्यपकाचा अत्याचार
बीड: शहरात वैद्यकीय शिक्षण घेणार्या एका 22 वर्षीय विद्यार्थीणीचा प्राध्यपकाने लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पिडितेला नापास करून पाच वर्षे एकाच क्लासमध्ये बसवेन, अशी धमकी देत तिचा 11 महिने लैंगिक छळ केला. अखेर पिडित विद्यार्थीणीने प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात दुसर्या वर्षात शिकणार्या एका 22 वर्षीय विद्यार्थीणीचा महाविद्यालयातीलच प्रा.डॉ. अनिस अहमद याने लैंगिक छळ केला आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास परीक्षेत कमी गुण देऊन नापास करेन आणि पाच वर्षे एकाच वर्गात बसवून ठेवेन, अशी धमकी त्याने पिडितेला दिली.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित 22 वर्षीय पिडित विद्यार्थीणी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिला पीसीओडीचा त्रास असल्याने ती नियमित तपासणीसाठी महाविद्यालयाच्याच रुग्णालयात जात होती. जानेवारी 2026 मध्ये पहिल्यांदा तपासणीच्या बहाण्याने महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिस अहमद याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिचा लैंगिक छळ सुरू केला.
त्यानंतर उपचाराच्या निमित्ताने सातत्याने तपासणीसाठी बोलावून गेल्या 11 महिन्यांत त्याने अशाच प्रकारचे गैरवर्तन केले. विद्यार्थीणीने या कृत्याला विरोध केला असता, ‘हा प्रकार कोणाला सांगितला तर परीक्षेत कमी गुण देईन, पास होऊ देणार नाही आणि एकाच वर्गात पाच वर्षे बसवेन’ अशी धमकी देत त्याने पिडितेवर दबाव टाकला. नापास होण्याच्या भीतीने पिडितेने अकरा महिने आरोपीचा त्रास सहन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पिडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. अनिस अहमद याच्याविरोधात विनयभंग, लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय व शैक्षणिक वर्तुळात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बीड पोलिस तपास करत आहेत.