आंतरवालीत प्रती आंदोलन, पोलिसांनी मंगेश ससाणेच्या आंदोलनास परवानगी नाकारली

आंतरवाली: मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे दि.29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज (दि.6) नववा दिवस. प्रकृती खालवल्याने आंतरवालीत समर्थकांची गर्दी वाढत असतानाच ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी आंतरवालीच्या वेशीवर गनिमी काव्याने आंदोलन सुरू केले आहे. मंगेश ससाणे यांच्या आंदोलनास अंबड पोलिसांनी प्रति आंदोलनाने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे परवानगी नाकारली असून आंदोलक मंगेश ससाणे आंदोलनावर ठाम आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने आंतरवाली सराटीमध्ये समर्थकांची गदी वाढत आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा निष्फळ झाल्याने समर्थकांतून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून
वडीगोद्री येथे सकाळपासून वारंवार धुळे- सोलापूर महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. महिलां समर्थकांनी आंदोलनात सभाग घेत महामार्गावरच लेझीम खेळत सरकारला मुंबईत आंदोलनाचा ईशारा दिला. प्रकृती खालावत असल्याने राज्यभरातून मराठा बांधव जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवालीच्या दिशेने धाव घेत असतानाच रविवारी (दि.6) ओबीसी नेते अॅड मंगेश ससाणे यांनी गनिमी काव्याने आतरवाली सराटी शिवारातील आंतरवालीकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला खासगी जागेत लाक्षणीक उपोषण सुरू केले.
ओबीसी आरक्षण बचाव चा नारा देत मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल यांनी लाक्षणीक उपोषण सुरू केल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मंगेश ससाणे यांच्या आंदोलनापासून अगदीच हकेच्या अंतरावर वडीगोद्री वे ब्रिजवर रास्तारोको आंदोलन सुरू होते. जरांगे पाटील यांच्याकडे जाणारे व भेट घेवून येणार्या समर्थकांच्या रस्त्यावरच ससाणे यांनी आंदोलन सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांंनी रास्तारोकोकडे बंदोबस्तात असलेल्या कर्मचार्यांना ससाणे यांच्या आंदोलनस्थळावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात केले.
प्रति आंदोलनामुळे तणाव: आंतरवाली सराटीमध्ये गेल्या 9 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे निर्णायक आमरण उपोषण सुरू आहे आता त्याच गावात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगेश ससाणे प्रतिआंदोलन सुरू केल्यामुळे गावकर्यांमध्ये आणि जालना जिल्हयात चिंतेचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांनी आंतरवाली सराटीच्या वेशीवरच आंदोलन सुरू केले.
दरम्यान, दुपारनंतर मंगेश ससाणे यांच्या आंदोलनासाठी स्टेज उभारणीचे काम सुरू असताना गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक ए. जी. गुरले यांनी आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली. ज्यामध्ये जालना जिल्ह्यामधील सामाजीक परिस्थिती पाहता आपल्या आंदोलनामुळे समाजीक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, निवेदनाचे अवलोकन करता आपण उपोषणाचे जागे बाबत जागा मालक /ग्रामपंचायतीचे परवानगीचे कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाहीत, मराठा आरक्षण मागणीसाठी मागील दि.29 ऑगस्टपासून आंतरवाली येथे उपोषण सुरू आहे.
सरद आंदोलनास भेट देण्यासाठी दररोज मोठा जनसमुदाय येत असून आपन दिलेल्या निवेदनामधील आंदोलनाचे ठिकाण हे आंतरवालीकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन जनजिवन विस्कळीत होवू शकते या कारणास्तव पोलिसांनी मंगेश ससाणे यांच्या आंदोलनास परवानगी नाकारली. शिवाय स्टेजचे कामही पोलिसांनी रोखले. मात्र आंदोलक मंगेश ससाणे व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलनावर ठाम असून त्यांनी आता आंतरवालीच्या वेशीवर आंदोलन सुरू केल्याची माहिती आहे.



Comments