top of page

संतोष देशमुख हत्या प्रकरण : सरकारी पक्षाकडून न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी ’ महत्वपूर्ण युक्तिवाद

2 hours ago
1 min read

बीड: राज्यात खळबळ उडवून देणार्‍या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्याला आता वेग आला आहे. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या सुरक्षेबाबत म्हणजेच ‘ चेन ऑफ कस्टडी ’वरआपला महत्वपूर्ण युक्तिवाद पूर्ण केला. न्यवायालयातील या सुनावणीनंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.


आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पुराव्यांच्या साखळीबाबत सविस्तर बाजू मांडली. गुन्हा घडल्यापासून ते फॉरेन्सिक तपासणी आणि न्यायालयात पुरावे सादर करेपर्यंतच्या सर्व टप्यांवर सर्व भौतिक व तांत्रिक पुरावे अत्यंत सुरक्षितपणे जतन करून हस्तांतरित करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फेरफार किंवा छेडछाड झालेली नाही, हे दाखवून देत ‘ चेन ऑफ कस्टडी’ कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.


युक्तिवाद पूर्ण करतानाच या खटल्यातील गांभीर्य लक्षात घेता, साक्षीदार आणि पुराव्यांची तपासणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली जेणेकरून मूळ खटल्याच्या सुनावणीला गती मिळेल. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत या प्रकरणाची पुढील तारखी 30 सप्टेंबर दिली आहे. आता संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्यभराचे आणि देशमुख कुटुंबीयांचे लक्ष या सुनावणीकडे लगले आहे.


दरम्यान, मस्साजोगचे संरपंच दिवंगत संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास करत आरोपींसह त्यांच्या सहकार्‍यांना अटक केली असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आता 30 सप्टेंबरची सुनावणी निर्णायक ठरणार आहे.

Comments


bottom of page