ओबीसी एल्गार मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना; परवानगीची गरज काय, मुंबईत धडकणारच! - लक्ष्मण हाके
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

पुणे: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.1) पाटस (ता. दौड) येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार मोर्चास पाटस येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून प्रारंभ करण्यात आला.हजारो समर्थकांच्या सहभागत मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चास परवानगी नसल्याचे कारण देत पाटस टोलनाक्यावर पोलिसांनी रोखला. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चा रोखून धरल्याने मोर्चेकर्यांनी सोलापूर- पुणे महामार्गावर ठिय्या मांडला. आंदोलकांनी मार्गावर ठिय्या मांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलक पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, मुंबईकडे जाण्यावर ठाम असलेल्या आंदोलकांनी आगे कूच केली.
दौंड तालुक्यातील पाटस येथून मुंबईकडे सकाळी निघालेला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा पुणे- सोलापूर महामार्गावर पाटस टोल नाक्यावर पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ उडाला. यवत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे तब्बल तीन साडेतीन तास आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. राज्यातील ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी, बोगस आणि बनावट ओबीसी जातीचे दाखले रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाचाली मोर्चा अयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 10:00 वाजताच्या दरम्यान पाटस येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा पाटस टोलनाक्यावर येऊन धडकला. टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला असता, पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चा रोखला. यावेळी पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक गिल यांनी मोर्चाला परवानगी नसल्याने पुढे जाता येणार नाही, असे आंदेालकांना सांगितले. मात्र, आंदोलकांनी पोलिसांचे म्हणणे फेटाळून लावत मुंबईकडे जाण्यावर ठाम भूमिका घेतली. परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पुणे- सोलापूर महामार्गावरच ठिय्या आंदेालन सुरू केले. सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी दोन-तीन वेळा सविस्तर चर्चा केली, मात्र हाके आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि पाटस-दौंड- अष्टविनायक मार्गावर चारही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली. शेकडो वाहने अडकून पडल्याने वाहनचालक आणि प्रवशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
तीन ते साडेतीन तासानंतर पोलिस अधीक्षक गिल आणि लक्ष्मण हाके यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या मोर्चाला पुढे जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर पुणे -सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या आंदोलनामुळे पाटस आणि टोलनाका परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आमचा मोर्चा शांततेत आहे. बोगस दाखले रद्द करा हीच आमची मागणी आहे. आम्हाला कितीही रोखले तरी ओबीसीचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचणारच असा निर्धारही लक्ष्मण हाके यांनी यावेळी केला.



Comments