आमदार रोहित पवार शेतकर्यांच्या बांधावर: दुष्काळाची भिषणता, पावसाअभावी खरीप पीके करपली; हतबल शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी

धाराशिव : मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसा अभावी शेतातील खरिपाचे उभे पीक करपून गेले आहे. जूनच्या पहिल्या पावसाच्या ओलीवर संभाव्य पावसाच्या भरवश्यावर लाख मोलाचे खत-बीयानं मातीआड करून पेरणी केली. पेरणीनंतर कशीबशी रिमझीम पावसावर उगवन झाली मात्र उपयुक्त पावसाअभावी खरीपाला बहर आलाच नाही.
परिनामी पावसाअभावी शेतातील उभं पिक डोळ्यादेखत करपून गेलं. शेतातील करपलेल्या उभ्या पिकाकडं पाहून डोळ्यात पाणी येतं, शेती उत्पादनावर रंगवलेले लेकी बाळांच्या शिक्षणासह त्यांचे हात पिवळे करण्याचे स्वप्नतर भंगलेच पण आता जगावं कसं हा यक्ष प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे, मायबाप सरकारने तात्काळ दखल घेवून मदत करण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रविवार (दि.20) धारशिव जिल्ह्यातील रत्नापूर (ता. कळंब) येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन खरीप पीकांची पाहाणी केली. यावेळी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांनी पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, पिकांच्या नुकसानीसह त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
पावसाअभावी अनेक शेतांमधील पीकं सुकून करपल्याचे पाहाणीतून दिसून आले. मगशागत, बियाणे, खते, औषधींसह पेरणीसाठी मोठा खर्च करूनही उत्पादन हातातून गेल्याचे नैराश्य शेतकर्यांच्या चेहर्यांवर स्पष्ट दिसून आले. पिकांची अवस्था पाहतान अनेक शेतकर्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.
“पावसाअभावी डोळ्यादेखत शेतकर्यांचे सोयाबीन करपून गेले आहे, आसमानी संकटामुळे शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. रत्नापूर परिसरातील सोयाबीनसह इतर खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना 50 हजार रुपये एकरी मदत द्यावी. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टिच्या पीकविम्याची रक्कम अद्याप मिळाली नसलेल्या शेतकर्यांना विम्याचे पैसे तातडीने द्यावेत. येत्या पाच दिवसांत चारा छावण्या सुरू कराव्यात. तसेच शेतकर्यांच्या मुलांच्या शैक्षणीक शुल्कात सवलत देऊन त्यांना मदत करावी” अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, “ शेतकर्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर पावसाअभावी पिकांची झालेली दयनीय अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. केवळ कागदोपत्री आढावा घेऊन चालणार नाही. शासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना तातडीने दिलासा द्यावा” असंही रोहित पवार म्हणाले.
पावसाने आणखी ओढ दिल्यास परिसरातील खरीप पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानीच सर्वेक्षण करून शेतकर्यांना आर्थिक मदत जाहिर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, कळंब तालुकाध्यक्ष तुषार वाघमारे, अविनाश जाधवर, गोविंद मुंडे यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments