top of page

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ’गुंगी गुडीया’ संबोधल्यावरून राजकारण तापलं

मुंबई: राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने सोशल मीडियाद्वारे ‘ गुंगी गुडिया’ अशी टीका केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस कार्यालयात प्रवेश करत आंदोलन केले.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज (मंगळवारी) पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली. यावेळी त्यांनी ज्या एक्स (ट्विटर) पोस्टवरून सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडीया’ म्हणून हिणवण्यात आलं, त्याबात हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारून माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आमचे भांडण काँग्रेस पक्षाशी नसून अपमानकारक पोस्ट करणार्‍याविरेाधात हे आंदोलन आहे” अशा भावना व्यक्त केल्या.


दरम्यान, या आंदोलनावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी काँग्रेसच्या वैचारिक पातळीवर आणि भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली, ते म्हणाले, “ काँग्रेसच्या नेत्यांना कदाचित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विचारांचा विसर पडला असावा, इंदिराजींप्रमाणेच सुनेत्रा पवारही भविष्यात इतिहास रचतील. एकीकडे महिला सन्मानाची आणि ‘ दुर्गा’ बनण्याची भाषा करायचे आणि दुसरीकडे महिला नेत्यांचा असा अपमान करायचा, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे” असं ते म्हणाले.


सुनेत्रा पवार सर्व प्रश्नांना उत्तरे देत आहेत. परंतु काँग्रेस नेत्यांना स्वत:च्या सोयीचे तेवढेच दिसते. त्यांचे कान बहिरे झाल्यामुळे त्यांना उत्तर ऐकू येत नसावे. महिलेला कमी लेखणे ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का, हे हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर करावे. ते आमच्याशी चर्चा करतात की पळून जातात, हेच आम्हाला पाहायचे आहे” असंही सुरज चव्हाण यावेळी म्हणाले.

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या बीड दौर्‍यातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसत होत्या. हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रसने “ सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘ गुंगी गडिया’ बनुन राहणार?” असा प्रश्न उपस्थित केला होता. या शब्दांवर तीव्र आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर महिलांचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आणि त्यांना कमी लेखण्याचा आरोप केला आहे.

Comments


bottom of page