राहुल गांधीच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमने-सामने
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 1 min read

पुणे: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘ छात्रो की गूंज ’ या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात मोठा राडा झाला आहे. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या परिसरात गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहचून वाद मिटवला.
मिळालेल्या माहितीनुसार, एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेच्या परिसरात आले आणि त्यांनी या ठिकाणच्या तरुणांना राहुल गांधीच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत धमकावत असल्याचा अरोप युवक काँग्रेसने केला. या गोंधळानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही गटांना पांगवले.
दरम्यान, पुण्यातील आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएस मैदानावर 22 ऑगस्ट रोजी राहुल गांधींचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊपर्यंत कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली. या कार्यक्रमाला 8 ते 10 हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षीत आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी प्रवेश व्यवस्था आणि पुरुष- महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी किमान चार प्रवेशद्वार आणि स्वयंसेवकांची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे.
सर्व सबंधित विभागाकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे पोलिसांनी निर्देश दिले आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात आक्षेपार्ह तसेच धार्मिक भावना दुखवणारा मजकूर किंवा घोषणाबाजी टाळण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
विविध जिल्ह्यांतून महिला आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी विद्यार्थिनी आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.



Comments