अॅड. प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा ; RSS च्या प्रमुख नेत्याची पाकिस्तानच्या ISI एजंटची गुप्त भेट!
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य प्रवक्ते राम माधव यांच्यावर वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. राम माधव यांची पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ सोबत श्रीलंकेतील कोलंबो येथे तीन दिवस गुप्त बैठक झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नेमक्या कोणत्या मुद्यांवर ही चर्चा झाली? याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील जनतेसमोर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते शहरात आले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद गंभीर आरोप केले. आयएसआयचे माजी प्रमुख पतौडी आयि इतर लोकांसोबत राम माधव यांच्याशी चार मुद्यांवर चर्चाझाली असल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली आहे.
चर्चा कोणत्या मुद्यांवर झाली याचा खुलासा मोहन भागवत यांनी केला पाहिजे. तसेच ‘ मन की बात’ सांगणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केला पाहिजे. हा मुद्दा परराष्ट्र धोरणांशी संबंधित असल्याने आयएसआयच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी राम माधव यांना अधिकार दिलाहोता का? याचा खुलासाही मोदी यांनी करावा.
भाजप एकीकडे मुस्लिमांना कोणत्याच निवडणुकीत तिकीट देत नाही. पुलवामाचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तानला धडा शिकविला जाईल, असे सांगत असताना दुसरीकडे आतंकवाद्यांना संरक्षण देणार्या आयएसआय सोबत चर्चा करते यामागे काही तरी गंभीर स्वरुपाचे षडयंत्र रचले जात असल्याची शंका आंबेडकर यांनी उपस्थित केली.
पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी ही चर्चा केली जात असेल तर ती खुल्यापणाने करावी आणि चर्चेतून काय निष्पन्न झाले, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. आरएसएस आणि पाकिस्तान या दोन्ही जुळ्या बहिणी असून दोघींनाही ब्रिटीशांनीच जन्माला घातले आहे. देशात अराजक माजविणार्या आयएसआयसोबत आरएसएसचे प्रवक्ते चर्चा करतात हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांनी जनतेसमोर उपस्थित केला पाहिजे होता.
परंतु वंचित बहूजन आघाडी सारख्या प्रादेशिक पक्षाला यावर आवाज उभवावा लागत आहे. देशातील जनता अद्यापही मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, बौद्ध विहार यामध्येच अडकलेली आहे. धार्मिक स्थळ किंवा मन:शांती देऊ शकतात. मात्र देशाच्या सुरक्षिततेचे आणि आर्थिक प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे भारतीय जनेतेने यावर गंभीर चर्चा करावी. जेणेकरून देशाच्या भरकटत चालणार्या राजकारणाल आळा बसेल, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेव्हा तेव्हा घोडचुका करते. अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना चीनच्या दौर्यावर गेले. त्यावेळी भारत आणि चीनचा मित्र असणार्या व्हिएतनामवरच हल्ला केला होता. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांना चीनचा दौरा अर्धवट सोडून यावे लागले होते, त्यावेळीही देशाची बदनामी झाली होती.
तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मुशरफ यांना चर्चेसाठी आगर्यात बोलविण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमकुवत होती. पाकिस्तानाच्या कर्जाला मुदतवाढ देण्यास अरब राष्ट्र तयार नव्हते. पाकिस्तान कोलमडून पडण्याची शक्यता असताना वाजपेयी यांनी चर्चेला बोलावून घेतल्याने अवळणार्या आर्थिक नाड्या सैल झाल्या. त्याचवेळी भारतावर पाकिस्तानने कारगिल हल्ला केल्याचेही ते म्हणाले. जेव्हा जेव्हा भाजप अडचणीत येते त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयची आठवण होत असल्याचा अरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
काँग्रेसने कार्यालयांना टाळे ठोकावे: आरएसएस आणि आयएसआय यांच्या गुप्त चर्चा झाल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर फार महत्वाचा आहे, असे असतानाही हा मुद्दा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला महत्वाचा वाटत नाही. त्याची चर्चा जनतेसमोर केली जात नाही. एवढेच नाही तर आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जातीय द्वेषातून अवमान केला जातो. यावरही आंदोलन करावे वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसने आपल्या कार्यालयांना टाळे ठोकावे, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.



Comments