top of page

देव दर्शनाहून परतणार्‍या भाविकांवर काळाची झडप! किनवटच्या तोटांबा घाटात चालकाचा ताबा सूटल्याने जीप झाडावर धडकली, चार भाविकांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

नांदेड: सहस्त्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेवून तेलंगणाकडे परतणार्‍या भाविकांच्या कमांडर गाडीला तोटांबा घाटात अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 31) घडली. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील कुबीर मंडळातील पारडी येथील भाविक सहस्त्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत असताना किनवट तालुक्यातील तोटांबा घाटात त्यांच्या वाहनाला अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊल धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहरे काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील कुबीर येथे हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त कमांडर जीप ही सहस्त्रकुंड ते तेलंगणा दरम्यान नियमित प्रवासी वाहतूक करणारी असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे सहस्त्रकुंड परिसरात शोककळा पसरली असून, पुढील तपास किनवट पोलिस करत आहेत.

Comments


bottom of page