top of page

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

‘दैवी शक्ती’ च्या नावाखाली महिलेला थेट लॉजवर नेलं; आधी कुंडात अंघोळ नंतर अत्याचार, धरणगावच्या महेशगिरी च्या विरोधात लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक: मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भोंदूगिरीच्या घटना उजेडात येत आहेत. नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे तर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव येथील एका भोंदू बाबाने कौटुंबीक समस्या दूर करण्याच्या नावाखाली एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेचे लैंगिक शोषण केलेल्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदूवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे कुटुंब मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे टेन्शनमध्ये होते. त्यामुळे हे घरगुती तणावावर तोडगा काढण्यासाठी या महिलेचे कुटुंबीय धरणगाव येथील महेशगिरी याच्या मठात गेले होते. यावेळी भोंदू बाबाने महिलेला बाहेरची बाधा असल्याचं सांगून भीती घातली आणि दैवी विधीच्या नावाखाली तिला एका कुंडात अंघोळ करायला लावून ओल्या वस्त्रनिशी उंबराच्या झाडाला फेर्‍या मारायला लावल्या. त्यानंतर काही दिवसांनी भोंदूने या महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल मेसेज पाठवायला सुरुवात केली.


एकदा त्याने असाच मेसेज पाठवत दैवी विधीसाठी एकांतात यावे लागेल, असं सांगून तिला नाशिकमध्ये बोलावलं. त्यानंतर तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.


यावेळी, “ माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असून माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही” अशी धमकी देत त्याने महिलेवर अत्याचार केला आणि तिचे अक्षेपार्ह फोटोही काढल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या (अंनिस) पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला आणि हा सर्व प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, लासलगाव पोलिसांनी महेशगिरी काकडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


मात्र, अशा भोंदूबाबांच्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शिवाय महिलांनी देखील असं भोंदूच्या जाळ्यात अडकू नये यासाठी महिलांमध्ये जनजागृती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments


bottom of page