भोंदू मनोहर भोसलेला तीन दिवसाची पोलिस कोठडी
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

सोलापूर: जिल्ह्यातील कुर्डूवाडीत भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्यवसायसात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मनोहर भोसले व त्याच्या साथिदारास आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूने न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांच्या वतिने अॅड. सुभाष हल्याळकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गुन्ह्यातील कलमे 7 वर्षाखालील असल्याने नोटीस देऊन अटक करायला हवी होती, असा युक्तिवाद त्यांनी केला.
सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद करत भोसले हा सराईत गुन्हेगार असल्याचे नमूद केले. तसेच त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले.
दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या निर्णयामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता. पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
मनोहर भोसलेचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथे 27 एक्करात पसरलेला आलिशान आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे. येथे दर आमवस्येला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असे. बाबाला भेटण्यासाठी 11 हजार रुपयांची फी घेतली जात असल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
कोण आहे मनोहर मामा भोसले
इंदापुर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी, डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडी बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता., एक दिवस तो अचानाक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला., करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वत:चा मठ थाटला होता., साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर आमवस्याला त्याच्याकउे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली., अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत., अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे., याआधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे., कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे., 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.



Comments