शिवसेना (ठाकरे) पक्षाचे 16 आमदार आणि 7 खासदारां सोबत अंतिम बोलणी झाली; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

राज्यात सद्यस्थितीत कुठल्याही निवडणुका नसताना ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वेगळा गट स्थापन होत असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असून एकनाथ शिंदेंच्या ‘ ऑपरेशन टायगर’ची चर्चा होत आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम बोलणी झाल्याचा दावा केल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला उब मिळत आहे. मात्र,मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टपणे हा दावा फेटाळून लावला आहे.
राज्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून होत असलेल्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. मात्र, त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम बोलणी झाल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेतील आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. तसेच, ऑपरेशन टायगर फायनल झाले आहे, फक्त या आमदार व खासदारांच्या पक्ष प्रवेशाची तारीख ठरायची आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर शिवसेना उबाठा पक्षातील आमदार, खासदार नाराज असल्याने ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत असे कृपाल तुमाने यांनी म्हटले.
उबाठाच्या कोणत्याही खासदारांसोबत संपर्क नाही, अशी कोणतीही मीटींग झाली नाही, आम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच, संयज राऊत यांच्या पेशन्सला दाद देत त्यांनी उबाठाचं अस्तित्व टिकवलं आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे एकप्रकारे उदय सामंत यांनी ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचेच सूचवलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार वेगळा गट तयार करण्याच्या हालाची सुरू आहेत, यासंदर्भात रावसाहेब दानवे म्हणाले की, ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आगोदर तामिळनाडूमध्ये एक गट सुद्धा स्थापन झाला. एका पक्षात विलिनीकरण सुद्धा झाले. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेतील तो गट वेगळा होतो की नाही होतो, हे तोच पक्ष ठरवू शकतो. भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. अजून तरी गट स्थापन नाही, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी ऑपरेशन टायगरवर दिली.



Comments