top of page

बंडखोर खासदारांचे मतदारसंघात फिरण्याचे वांधे?; संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक खासदार वाकचौरेंच्या पुतळ्याचे दहन

शिवसेनेचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात संगमनेरमध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आलं. आंदोलक शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना (ठाकरे) पक्षातील एकूण 9 पैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. बंडखोर खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होणार असल्याची माहिती आहे.


शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होवून या खासदारांनी बंड पुकारल्याचा दावा करण्यात येत आहे. खासदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच वर्षात शिवसेनेला दुसर्‍यांदा मोठ्या फुटीला सामोरं जावं लागत असल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षात स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे.


पक्षांच्या अनेक नेत्यांनी रोष व्यक्त केला आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात तर अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.


दरम्यान, वाघचौरे यांच्या भूमिकेमुळे शिर्डीतील ठकारेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. 2014 साली वाकचौरे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले होते. त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली होती, मात्र साईबाबांची शपथ घेतल्याने त्यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरेंनी 2024 मध्ये पुन्हा उमेदवारी दिली. आता वाकचौरे यांनी ठाकरेंशी पुन्हा गद्दारी केली असून, त्यांना येणार्‍या काळात धडा शिकवू अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.


खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात संगमनेरमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन करत वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. गद्दारी सहन केली जाणार नाही, ठाकरे विचारांशी विश्वासघात करणार्‍यांना माफी नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकत्यांनी वाकचौरे यांच्यावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांना आगामी काळात मतदारसंघात फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे बंडाच्या जोरावर वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदेच्या पक्षात सामील होणार्‍या बंडखोर खासदार कार्यकर्त्यांच्या रोषाला कसे सामोरं जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments


bottom of page