top of page

अजित दादांच्या राष्ट्रवादीत रुपाली विरुद्ध रुपाली! रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला, रुपाली ठोंबरेवर कारवाई होणार?

ree

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं त्यांच्याच प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. रुपली पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध टीका केली होती. हेच प्रकरण रुपाली पाटील यांना भोवण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या नोटिशीमध्ये रुपाली पाटील यांनी पक्षाची शिस्त मोडल्याचं म्हटलं आहे. ही नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस राज्य संघटनेचे सचिव संजय खोडके यांच्या सहीनं पाठवण्यात आली आहे. रुपली पाटील ठोंबरे यांना सात दिवसाच्या आत नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. जर तसं केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.


रुपाली पाटील ठोंबर यांनी काही महिला संघटनांच्या साथीनं पुण्यातील महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. त्यांनी हे आंदोलन सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या जीवन संपवण्याचा प्रकरणात केलं होतं. त्यावेळी ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नोटिशीला उत्तर देत रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर शुक्रवारी रात्री एक पोस्ट लिहिली, त्यात त्यांनी पक्षानं उत्तरासाठी दिलेला वेळ हा अत्यंत कमी असल्याचं सांगितलं. त्या यावर सविस्तर खुलासा करणार आहेत असं देखील सांगितलं आहे.


त्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘ मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत पक्षानं माझ्याकडं स्पष्टीकरण मागितलं आहे. मी याबाबत सर्व अनुशंगानं विस्तृत असं स्पष्टीकरण देणार आहे. यात वैयक्तिक लाभापासून हगवणे प्रकरण, सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण या सर्व विषयांचा समावेश असेल.


‘ मात्र ज्यांनी मृत भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्यांच्याबाबत खरंच काय स्पष्टीकरण द्यायचं? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. त्यामुळं रुपाली पाटील ठोंबरे या नोटिशीला उत्तर देतील का नाही याबाबत संभ्रम आहे. जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार का हा देखील मोठा अन् कळीचा मुद्दा असणार आहे.

Comments


bottom of page