top of page

अतिवृष्टीतही चार दसरा मेळावे, दोन मेळावे रद्द!

यंदाच्या दसरा मेळाव्यातून पूरग्रस्तांना मदत; पिचलेल्या बळीराजाला सावरण्याची मिळणार उर्जा

ree

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पिकांसह शेती खरडून गेली,माणसांसह अनेक जनावरांना जीव गमवावा लागल. महापूरामध्ये संसापरयोगी साहित्यांसह जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने हजारो संसार उघड्यावर आले.पिकांसह खरडून गेलेल्या शेतीसोबत शेतकर्‍यांचे स्वप्नही वाहून गेले. नुकसानीतून सावरताना पुन्हा उभा राहण्यासाठी पूरग्रस्त शेतकरी धायमोकलून आक्रोश करत असताना राज्यात परंपरेनुसार सहा पैकी चार दसरा मेळावे होत आहेत.


दसरा मेळाव्याच्या परंपरेला यंदा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दसरा मेळाव्यांना उत्साह नसला तरी परंपरा टिकवण्यासह संकटावर मात करण्यासाठी दसरा मेळाव्यांची परवणी साधक ठरणार आहे. अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकरी,शेतमजूर, व्यवसायिकांना मदतीसाठी राज्यभरातून सामाजिकसंस्थांनी पुढाकार घेतला आहे. अतिवृष्टीमुळे दसरा मेळाव्याचा खर्च टाळण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पारंपारीक दसरा मेळावा रद्द केल्याचे जाहिर केले. त्याचप्रमाणे भाजप आमदार सुरेश धस यांनी मच्छींद्रनाथ संजीवनी समाधी सावरघाट येथील पारंपारीक दसरा मेळावा रद्द केल्याचे जाहिर केले आहे.


परंपरेनुसार राज्यात यंदा शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी यंदा गोरेगावच्या नेस्को मैदानात भव्य तंबूत होणार आहे . पावसाची शक्यता लक्षात घेऊन हे ठिकाण बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा पूरग्रस्त बीड जिल्ह्यात सावरगाव घाटच्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. त्याचवेळी विजयादशमीचा मुहूर्त गाठत मराठा आंदोलक मनोज जरांगे हे नारायण गडावर पारंपारीक दसरा मेळावा घेणार आहेत.


शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणार असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरस्थिती लक्षात घेता त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता शेतकर्‍यांच्या मदतीसाठी काम करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.


या आपत्तीत शिवसेना पूरग्रस्त शेतकर्‍यांना 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देत असून, शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहोचली जाईल. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही, असेही शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या प्रमाणेच पंकजा मुंडे यांनीही भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यास येताना पूरग्रस्तांसाठी गव्होच पीठ चणाडाळ, गूळ आदी साहित्य घेऊन येण्याचे अवाहन समर्थकांना केले. ही मदत पूरग्रस्तांना दिली जाईल असे त्या म्हणाल्या.


श्रीक्षेत्र नारायण गडावरील दसरा मेळाव्याचा सर्व खर्च गडाचे महंत शिवाजी बाबा महाराज यांनी गडाकडून करण्यात येणार असल्याचे पूर्वीच जाहिर केले आहे. शिवाय दसरा मेळाव्यासाठी येणार्‍या भाविकांनी गडा ऐवजी पूरग्रस्तांना देणगी स्वरुपात मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.


मराठवाडा आणि विशेष: बीड, सोलापूर, धाराशीव, जालना, लातूर, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजी नगर, परभणी आदी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांना मदतीसाठी धनीक, दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते.


मराठा सेवकांनी पूरग्रस्तांना लागणार्‍या अवश्यक सामग्रीची मदत कराण्याच्या जरांगे पाटलांच्या आवाहना प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा सेवकांनी पूरग्रस्तांसाठी आवश्यक सामाग्रीची मदत पोहोच केली. यंदाचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने होणार असल्याचे गडाचे महंत शिवाजी बाबा महाराज, जरांगे पाटील यांनी जाहिर केले आहे. श्री क्षेत्र नारायण गडावर येणार्‍या मार्गावरील पुलांच्या डागडूजीसह वाहून गेलेल्या रस्त्यांची दूरुस्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर दसरा मेळाव्याची तयारीही पूर्ण झाल्याचे गडाचे महंत शिवाजी बाबा महाराज यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

Comments


bottom of page