top of page

अवैध वाहतूक प्रकरणी पालघर पोलिसांची कारवाई

दोघे ताब्यात; 32.96 लाखाचा मुद्देमाला जप्त


ree

तलासरी : पालघर जिल्हा पोलिसांनी अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करत तब्बल ३२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि तलासरी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.


आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, लाल रंगाचा आयसर टेम्पो (क्रमांक MH-10 DT 6633) मधून गुटखा वाहतूक होणार आहे. तलासरीतील  ईभाडपाडा ओव्हरब्रिजजवळ नाकाबंदी करण्यात आली असता, संशयित टेम्पो पोलिसांच्या हाती लागला. तपासणीदरम्यान त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला २०.९६ लाख रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखू आढळून आला. टेम्पोसह एकूण ३२.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी टेम्पो चालक बाळु किसन गंगावणे (वय ५०, रा. सांगली) आणि त्याचा साथीदार राजु संजय कांबळे (वय २७, रा. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कारवाईत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व डहाणू उपविभागीय अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), पोनि अजय गोरड (तलासरी पोलीस ठाणे) तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. पुढील तपास पोउपनि अमोल चिंधे (तलासरी पोलीस ठाणे) करत आहेत.

Comments


bottom of page