top of page

मुंबईत अलर्ट: 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता 8 अल्पवयीन मुलींचा समावेश, मानवी तस्करी करणारी टोळी सक्रिय ?


मुंबई: मुंबईतील विविध भागातून 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता मुलांमध्ये आठ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईपोलिसांनी अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवली असून माणवी तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


मुंबईतील 7 विविध पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत ज्यामध्ये आठ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. त्यानुसार शहराच्यसा शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतून 4, साकिनाका पोलिस ठाणे हद्दीतून 2, अ‍ॅन्टॉहिल पोलिस ठाणे हद्दीतून 2 तर ओशिवरा, मानखुर्द, बांगूरनगर, घाटकोपर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशी एकून 12 मुले बेपत्ता झाल्याने पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 137(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही पालकाला खंडणीसाठी फोन आलेला नाही. यामुळे ही मुले मजुरी किंवा तस्करीसाठी पळवली असावीत, असा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.


मुुंबई पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहिम राबवली आहे. मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. शहरामधील गजबजलेल्या बाजापेठा, सार्वजनिक बाग, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आणि इतर सर्वाजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासणी, पायी गस्त आणि तांत्रिक सर्वेक्षण वाढविण्यात आले आहे. वेगवेगळ्या पथकांना शोधकार्यासाठी नेमले गेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमध्ये अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जून ते डिसेंबर या कालावधीत 145 मुले बेपत्ता झाली आहेत, ज्यामध्ये 93 मुलींचा समावेश आहे. तर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यातच म्हणजे अंदाजे 5 आठवड्यात 82 मुले बेपत्ता झाली आहेत. जून महिन्यामध्येच सर्वाधिक 26 मुली बेपत्ता झाल्या होत्या.


सरकारने याचा छडा लावला पाहिजे:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, बेपत्ता मुलांबाबत सरकारने लक्ष द्यायला हवे, आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी एक महिला आल्या आहेत. मुली बेपत्ता होण्याचा जो प्रकार आहे , त्याचा छडा त्यांनी लावायला पाहिजे. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणार्‍यांवर काही तासांत कारवाई होत असेल, तर मग यास सामान्य घरातील मुली बेपत्ता होत असतील किंवा पळवून घेऊन जात असतील तर ती जबाबदारी कोणाची” असा सवाल त्यांनी केला आहे.

याला जबाबदार कोण? गृहमंत्रालय काय करत आहे:

महिला बालसुरक्षेच्या फक्त घोषणा करणार्‍या सरकारकडून प्रत्यक्षात संरक्षण मिळत नाही, हे पुन्हा एकदा उघड झाले. पालकांच्या मनातील भीती मुलांचे असुरक्षित भविष्य आणि समाजातील वाढती दहशत याला जबाबदार कोण? गृह मंत्रालय काय करत आहे? मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याची जबाबदारी स्वीकारून ठोस पावले उचलावीत. बेपत्ता मुलांचा शोध प्राधान्याने घेतला गेला पाहिजे, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल, अशी कृती सरकारकडून अपेक्षित आहे असं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या

Comments


bottom of page