top of page

आता आरक्षण वाचवण्यासाठी आत्महत्येची वेळ आली - मंत्री भुजबळ

लातूरमध्ये ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या भीतीने एकाची आत्महत्या; भुजबळ, आमदार मुंडेयांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन

ree

लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड (वय 35) यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या भीतीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ठ करण्याच्या सरकारच्या निर्णयाला भुजबळ यांनी विरोध दर्शवला, तर मुंडे यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली. सर्वांनी संयम राखावा आणि आत्महत्या सारखे टोकोच पाऊल उचलू नये, असे अवाहन नेत्यांनी केले.


भरत कराड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली होती. त्यांच्या मते, या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल.

ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून, त्याची पडताळणी सुरू आहे. भरत यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी,तीन मुली, एक मुलगा आणि आई यांचा समावेश आहे. त्यांच्या आत्महत्येमुळ—े गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर ओबीसी समाजाने आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची केली आहे.


मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या सरकाच्या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाने (जीआर) राज्यात वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषण करणार्‍या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्याने ओबीसी समाजात असंतोष वाढला. परंतु नंतर छगन भुजबळ यांनी या निर्णयाला कडाडून विरेाध दर्शवला आहे.

कराड कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले भुजबळ म्हणाले की, “ आमच्या आरक्षणात कोणतेही अतिक्रमण आम्हाला मान्य नाही. लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का? आम्ही आमच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा देऊ.” त्यांनी ओबीसी समाजाला संयम राखण्याचे आणि अशा टोकाच्या पावलांपासून परावृत्त होण्याचे आवाहन केले.


धनंजय मुंडे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वांना संयम राखण्याची विनंती केली. “ ज्यांच्यासाठी आरक्षण आहे, तेच जर अशा प्रकारे आत्महत्या करू लागले , तर मग हे आरक्षण कोणासाठी द्यायचे? भरत यांनी आपल्या कुटुंबाचा, मुलांचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलले. ही अत्यंत दुखद घटना आहे.

सरकार कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची खात्री दिली आहे,” असे मुंडे म्हणाले. त्यांनी समाजात समता राखण्याचे आणि जाती-जातींमध्ये वैमनस्य न वाढवण्याचे आवाहन केले. “ छत्रपती शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला जातींच्या भांडणांनी विखुरलेले चित्र शोभत नाही,” असही मुंडे म्हणाले.


दरम्यान, या घटनेनंतर लातूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. पोलिस अधिक्षक अमोल तांबे म्हणाले की, भरत यांनी नदीत उडी मारण्यापूर्वी कपडे काढून ठेवले होते, जे नदीकिनारी सापडले. त्यांच्या खिश्यात सापडलेली चिठ्ठी ही त्यांनीच लिहिली आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

या घटनेमुळे महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकारने सर्व समाजांचे हित जपण्याचे अश्वासन दिले असले, तरी ओबीसी आणि मराठा समाजातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत सर्वांनी संयम राखावा आणि कायदेशीर मार्गाने आपले हक्क मिळवावेत, असे आवाहन नेत्यांनी केले आहे.

Comments


bottom of page