आदिवासींच्या रेशनहक्कासाठी लाल बावट्यांचे ठिय्या आंदोलन
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read
प्रशासन झुकले, उत्पन्न दाखल्याची अट शिथिल

डहाणू : अन्नपुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात माक्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाने १० सप्टेंबर रोजी डहाणू अन्नपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. पारनाका येथून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचताच पोलिसांनी मुख्य द्वार बंद केले, मात्र हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी संघर्ष करत आत प्रवेश केला.
आदिवासी समाजाच्या रेशनकार्ड प्रकरणात अधिकारी जाचक अटी लादत असल्याचा ठपका आंदोलनकर्त्यांनी ठेवला. शेकडो कुटुंबांची प्रकरणे प्रलंबित ठेवून, ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र व तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्न दाखला सक्तीने मागवून गरीब आदिवासींना त्रास दिला जात असल्याचा आरोप जिल्हा सहसचिव कॉ. शेरु वाघ यांनी आंदोलनादरम्यान केला.
सुमारे तीन तास सुरू राहिलेल्या या ठिय्या आंदोलनात महिला, तरुण-तरुणी पारंपरिक गीते व घोषणाबाजी करत ठाम पवित्रा घेत होते. अखेर तहसीलदार सुनील कोळी यांनी चर्चेत पुढाकार घेतला. चर्चेनंतर प्रलंबित शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या, वेठबिगारांना प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी उत्पन्न दाखल्याची अट शिथिल केल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
या निर्णयानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. डहाणूत झालेला हा लढा आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी निर्णायक ठरला असून, प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.



Comments