top of page

आलोक सिंह हत्या प्रकरणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन


मुुंबई : मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे आलेक सिंह असून ते विलेपार्ले येथील एनएम महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते शनिवारी मालाड रेल्वे स्थानकात उतरत असताना ओंकार शिंदे याच्याशी त्यांचे भांडण झाले. त्यावेळी ओंकार शिंदे याने आलोक सिंह यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला. पोटात खोलवर घाव झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन आलोक यांचा मृत्यू झाला होता.


आलोक सिंह यांचे वडील अनिल सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक आहेत. गेल्या 25 वर्षापासून अनिल सिंह हे राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक आहेत. त्यामुळे आलोकसोबत माहलाड रेल्वे स्थानकात घडलेली घटना समजताच राजनाथ सिंह यांनी स्वत: मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकार्‍यांना फोन करून या प्रकरणात तातडीने कारवाइृ करण्याचे आदेश दिले.


राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्यापासून अनिल सिंह हे त्यांचे सुरक्षारक्षक आहेत. गेल्या 25 वर्षापासून अनिल सिंह हे राजनाथ सिंहांसोबत सावलीसारखे आहेत. ते राजनाथ सिंह यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनिल सिंह यांच्या मुलाबाबत ही दुर्दैवी घटना घडल्याचे कळताच राजनाथ सिंह यांनी तात्काळ फोन करून मुख्यमंत्री आणि इतर संबंधित अधिकार्‍यांना मदत करण्याची सूचना दिली. यानंतर झपाट्याने सूत्रे हलली आणि रेल्वे पोलिसांनी युद्धपातळीवर आलोक सिंह यांच्या मारेकर्‍याला शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली.


अलोक सिंह हे मुंबईतच लहानाचे मोठे झाले. राजनाथ सिंह यांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्यामुळे अनिल सिंह हे कायम मुंबईबाहेर असायचे त्यामुळे आलोक सिंह त्यांच्या काकांकडेच रहायचे अंधेरीतील बॉम्बे केंब्रिज शाळेत आलोक सिंह यांचे शिक्षण झाले. तीन वर्षापूर्वी आलोक सिंह यांचा पूजा यांच्याशी विवाह झाला. पूजा सिंह या देखील ठाकूर महाविद्यालयात शिक्षिका आहेत. आलोक सिंह शांत स्वभावाचे होते. ज्यादिवशी आलोक यांच्यावर हल्ला झाला त्यादिवशी पूजा यांचा वाढदिवस होता. घरी आल्यानंतर हे दोघे डिनरला जाणार होते. मात्र, त्यापूर्वी मालाड स्थानकात ओंकार शिंदे याने आलोक यांच्या पोटात चिमटा खुपसून त्यांची हत्या केली.


दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आलोक सिंह यांच्या कुटुंबीयांना मालाड रेल्वे स्थानकात हल्ला झाला त्यावेळचे सीसीसटीव्ही फुटेज दाखवले. यामध्ये आलोक सिंह हे 40 ते 45 मिनिट रेल्वे स्टेशनवरी तसेच पडून होते. यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर लवकरच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा आरोप आलोक सिंह यांचे काका सुनील सिंह यांनी केला. ओंकार शिंदे याने फक्त एकदाच धारदार चिमटा आलोक सिंह यांच्या पोटात खुपसला. मात्र, हा चिमटा नेमका आलोक सिंह यांच्या किडनीच्या भागात घुसला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन आलोक यांचा मृत्यू झाला.

Comments


bottom of page