आश्रमशाळा, वसतीगृह व बेरोजगारी प्रश्नांवर उपाययोजनांसाठी डहाणूत धडक मोर्चा
- Navnath Yewale
- Sep 24
- 1 min read
डिवायएफआय, एसएफआय च्या मोर्चाने दणानला परिसर

डहाणू : तालुक्यातील आश्रमशाळा, वसतीगृह तसेच आदिवासी तरुणांच्या वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि जिल्हा समितीच्या वतीने* डहाणूत भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी बाराच्या सुमारास सागर नाका, स्टेशन रोड येथून सुरू झालेला हा मोर्चा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पोहोचला. यावेळी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, वसतीगृहांमधील मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आणि बेरोजगारीच्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रशासनाकडे जोरदार मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या : एकलव्य शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करणे, आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये गरम पाणी, ग्रंथालय, व्यायामशाळा व संगणक कक्ष उपलब्ध करणे, रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे, विद्यार्थ्यांना मोफत संगणक, टंकलेखन व कौशल्यवर्धन प्रशिक्षण उपलब्ध करणे, बेरोजगार तरुणांसाठी वाहनचालक प्रशिक्षण व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, सर्व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण व आहारभत्ता देणे, वसतीगृहांमध्ये गाद्या व आवश्यक साहित्य पुरविणे, जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढणे, निवासी शासकीय वसतीगृहांतील भोजन ठेक्याची निविदा त्वरित काढणे, मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे.
मोर्चाच्या शेवटी प्रांताधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रशासनाने उपस्थित प्रश्नांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या मोर्चामध्ये साथी राजेश दळवी, कमलेश राबड, सुभाष पडवले, कॉ. भास्कर म्हसे, कॉ. गीता दौडा, कॉ. विरेंद्र दुमाडा, कॉ. अंकिता धोडी यांच्यासह तालुका कमिटीचे इतर सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Comments