top of page

उपमुख्यमंत्री पदासाठी हालाचली सुरू; प्रफुल्ल पटेल, छगनभुजबळ यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्यासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अस्तित्व आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आर्थमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. गुरुवारी बारामतीत अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठींमुळे या चर्चेला आता अधिक बळकटी मिळाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि भविष्यातील राजकीय जबाबदारीबाबत प्राथमिक चर्चा केली. पक्षात फाटाफूट होऊ नये आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकून राहावे यासाठी नव्या नेतृत्वाचा आराखडा तयार केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, तर सत्तेतील वाटा आणि महत्वपूर्ण उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचे नियोजन सुरू आहे.


मंत्री नरहरी झिरवळ यांनी उघडपणे सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस करून या चर्चेला तोंड फोडले आहे. “ अजित दादांच्या पाठीशी सावलीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सुनेत्रा वहिनींनीच आता पक्षाचे आणि राज्याचे नेतृत्व करावे, “अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या मते, सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, तर त्या पदावर ‘ सुनेत्रा अजित पवार’ हे नाव कायम राहील जी दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.


दरम्यान, 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला. विमानात हवेतच तांत्रिक बिघाडामुळे स्फोट होऊन ते शेतात कोसळले, ज्यात दादांसह पाच जणांचा मृत्यू झाला. आज 29 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका धडाडीच्या नेतृत्वाच्या निधनानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पवार कुटुंबाच्या निर्णयाकडे आणि महायुतीमधील आगामी सत्तावाटापाच्या नव्या समीकरणाकडे लागले आहे.

Comments


bottom of page