top of page

देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय- शरद पवार

मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत आंदोलक विद्यार्थ्यांच्या लढ्याचे कौतुक केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा निर्णय युवाशक्तीच्या एकजूटीचा विजय असल्याचे म्हटले आहे.


शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर सलग 28 दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख करत पवार म्हणाले, पंतप्रधान मोदीसोबत झालेल्या बैठकीचे परिणाम दिसले. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे.


यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही आभार मानले. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिले, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मन:पूर्वक आभार असे त्यांनी म्हटले.

पुढे पवार यांनी लोशाहीच्या भूमिकेवर भाष्य करत म्हटले, देशातील लोकशाहीने कात टाकली आहे. आणि त्याचे श्रेय देशातील युवा पिढीला जाते हे निश्चितपणे नमूद करावेसे वाटते. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ही पहिली मागणी पूर्ण झाल्याचा दावा केला आसून, इतर मागण्यांसाठी लढा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Comments


bottom of page