भारताचे भविष्य असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांचा विजय; भारताचे भविष्य भूतकाळाचा नक्कीच पराभव करेल - राहुल गांधी
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 2 min read

नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते आणि विरेाधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदत घेत केंद्र सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघात केला. “ हा कोणत्याही एका नेत्याचा नव्हे, तर भारताचे भविष्य असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांचा विजय आहे. शिक्षण व्यवस्थेचे झालेले वाटोळे बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा हा विद्यार्थ्यांचा रोष होता. धर्मेंद्र प्रधान हे या भ्रष्ट व्यवस्थेचे आणि असमर्थतेचे प्रतीक होते. त्यामुळे त्यांना जाणे भागच होते” असे राहुल गांधी म्हणाले.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आरएसएसवरही हल्लाबोल केला ते म्हणाले, “ भारताची शिक्षण व्यवस्था जगभरात आदर्श मानली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षात त्यावर सातत्याने आक्रमणे झाली. शिक्षण व्यवस्थेवर आणि संस्थावर आरएसएसने कब्जा केला असून तिला आतून कीड लावण्याचे काम आरएसएसने केलीे आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेवर झालेला हा हल्ला आहे. जर या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक असेल, तर तितकीच चूक आरएसएसचीही आहे.
मोदींनी माफी मागितली पाहिजे: विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक कारवाईवरून राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट आरोप केले, “ आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक कारवाईसाठी आणि गोळीबाराच्या पेलेट गन्सच्या वापरासाठी आम्ही थेट अमित शाह यांना जबाबदार धरतो. देशाच्या भविष्यावर आपल्या स्वत:च्या विद्यार्थ्यांवर आपल्याच फौजांनी गोळ्या झाडणे आम्हाला अजिबात मान्य नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होताच हा मुद्दा आम्ही अत्यंत आक्रमकपणे मांडणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच आंदोलकांवर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पंतप्रधान मोदींनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे, या मागण्यांवर काँग्रेस ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“ही देशाची मालमत्ता आहे, संविधान आणि संस्था देशाच्या मालकीच्या आहेत, ही कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नाही. जर तुम्ही याच मार्गाने पुढे जात राहिलात, तर आता जे आंदोलन झाले त्याच्या दहापट मोठे आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल. ही लढाई ‘ नरेंद्र मोदी व आरएसएस म्हणजेच भूतकाळ’ ‘ विरुद्ध’ भारताचे तरुण म्हणजेच भविष्य, अशी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की भारताचे भविष्य या भूतकाळाचा नक्कीच पराभव करेल.”
संसदेतील पुढील रणनीतीबद्दल बोलताना त्यांनी सांगीतले की, विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्वसंमतीने निर्णय घेतला जाईल आणि काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन पुढेही पूर्ण ताकदीने सुरूच ठेवेल असंही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.



Comments