top of page

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 46 जणांचे अर्ज बाद; एनडीए-इंडिया आघाडीत सरळ लढत

ree


उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीत आता एनडीएचे सी.पी.राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी या दोघांमध्ये लढत होणार आहे. या दोनच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अन्य 46 जणांचे 68 अर्ज कागदपत्रातील त्रुटी, प्रस्तावक आणि अनुमोदक म्हणून आवश्यक असलेल्या 20 खासदारांच्या सह्या किंवा 15 हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा न केल्यामुळे बाद करण्यात आले आहेत. यात पुण्याच्या उमेश म्हेत्रे यांचाही अर्ज अवैध ठरला आहे.


राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक अधिकारी पी.सी. मोदी म्हणाले, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 46 उमेदवारांचे 68 अर्ज दाखल केले होते. यातील पी.सी राधाकृष्णन आणि बुचिरेड्डी सुदर्शन रेड्डी या दोनच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अन्य 19 उमेदवारांचे 28 अर्ज राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुक कायदा 1992 च्या कलम 5 ब (4) नुसार अवैध ठरले. तर 27 उमेदवारांचे 40 अर्ज राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुक कायदा, 1992 च्या कलम 5 ब (1) (ब)किंवा 6 ब (1) (ब) आणि 5 क च्या तरतुदींनुसार अवैध ठरविले.


उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेशने दिल्ली गाठली आणि अर्ज दाखल केला. एका साध्या तरुणाने उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवारी अर्ज भरल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

उमेश याने याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देखील अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जावर अनुमोदक म्हणून 10 आमदारांच्या सह्या आवश्यक असल्याने त्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्याच धर्तीवर आता उमेशचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचाही अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे उमेश केवळ प्रसिद्धीसाठी ही गोष्ट करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


उपराष्ट्रपतीपदासाठी पात्रता काय?

उपराष्ट्रपतीपदासाठी संविधानामध्ये तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, सरकारी लाभ देणारे पद त्याच्याकडे नसावे अथवा तो सरकारी नोकरी करणार नसावा, त्याचे किमान वय 35 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार हा राज्यसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी पात असावा.


याशिवाय अर्जावर प्रस्तावक आणि अनुमोदक म्हणून आवश्यक असलेल्या 20 खासदारांच्या सह्या आवश्यक असतात. 15 हजार रुपये सुरक्षा ठेवही जमा करावी लागते. अन्य 68 अर्ज याच त्रुटींमुळे बाद झाले आहेत. त्यामुळे सीपी राधाकृष्णन आणि ही सुदर्शन रेड्डी या दोनच उमेदवारांमध्ये कडवी लढत होणार आहे.

Comments


bottom of page