top of page

बीडमध्ये एटीएसची मोठी कारवाई, धार्मिक कार्याच्या नवाखाली बनावट ट्रस्टचा पर्दाफाश ; 4 कोटी 73 लाखांवर रक्कम जप्त


बीड: जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत धार्मिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बनावट ट्रस्टचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून ट्रस्टच्या चार विश्वस्तांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.


राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध ट्रस्ट आणि स्वयंसेवी संस्थांची माहिती संकलित केली जात होती. याच प्रक्रियेदरम्यान गुलजार-ए-रजा नावाचा ट्रस्ट संशयाच्या यादीत आला. या ट्रस्टची स्वतंत्र वेबसाइट असल्याचे तपासात समोर आले. वेबसाइटवर देणगी देण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेचे खाते क्रमांक देण्यात आले होते. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे ट्रस्टचा पत्ता दाखवण्यात आला होता. मात्र, या ट्रस्टच्या कामकाजाबाबत अनेक शंका निर्माण झाल्या.


दरम्यान, एटीएसने अ‍ॅक्सिस बँकेच्या लातूर येथील मार्केट यार्ड शाखेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गुलजार-ए-रजा ट्रस्टच्या नावाने एकाच कस्टमर आयडीवर तब्बल पाच बँक खाती उघडण्यात आली होती. या खात्यांमध्ये देशभरातून जनतेकडून देणगी थेट जमा होत असल्याचे अढळून आले. तपास अधिकार्‍यांनी स्वत: व्यवहार करून या खात्यांची खातरजमा केली.


या नंतर बँकेत सादर केलेल्या केवायसी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ट्रस्टच्या नोंदणी क्रमोकात मोठी तफावत आढळली. ट्रस्टने वापरलेली नोंदणी क्रमोक हा प्रत्यक्षात अन्य एका संस्थेचा असल्योच स्पष्ट झाले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे चौकशी केली असता गुलजार-ए-रजा नावाचा कोणताही ट्रस्ट नोंदणीकृत नसल्याचे लेखी स्वरुपात कळवण्यात आले.


तपास अधिक खोलात गेल्यावर आणखी गंभीर बाबी समोर आल्या. ट्रस्टने दर्पण पोर्टल, प्राप्तिकर विभाग आणि बँक याठिकाणी वेगवेळे आणि बनावट नोंदणी क्रमांक वापरून कागदपत्रे सादर केली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे पॅन कार्ड काढून प्राप्तिकर विभागाची फसवणूक करण्यात आली. करचुकवेगिरी करण्यासाठी खोटी बँक विवरणपत्रेही सादर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या बनावट ट्रस्टच्या नावाने अ‍ॅक्सिस बँकेतील पाच खात्यांमध्ये एकूण 4 कोटी 73 लाख 67 हजार 503 रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या नावाखाली हा निधी गोळा करून तो स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.


या प्रकरणात गुलजार-ए-रजा ट्रस्टचे अध्यक्ष इम्रान शेख कलीम शेख, उपाध्यक्ष सय्यद मुजमिल सय्यद नूर, सचिव अहमदुद्दीन कैसर काझी आणि विश्वस्त तौफिक जावेद काझी यांच्या विरोधात सरकारतर्फे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बनावट ट्रस्ट आणि आर्थिक फसवणूक करणार्‍यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे.

Comments


bottom of page