जिल्हाबँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी: सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेचे22 लॉकर फोडले; 7 किलो सोने, 20 किलो चांदी लंपास
- Navnath Yewale
- 22 hours ago
- 2 min read

सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता.आटपाडी) शाखेत चोरट्यांनी स्ट्राँग रूम फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला. तब्बल 22 लॉकर्स फोडत चोरट्यांनी सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड लंपास केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर चोरांनी हँडग्लोव्हज, तंत्रज्ञान आणि प्लॅनिंग करत चोरी करत पोलिसांनाच थेट आव्हान निर्माण केले आहे . सध्या घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून श्वान पथक आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीचा तपास वेगात सुरू केला आहे. तर जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी अशी याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.
झरे येथील बसस्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँक भाड्याने कार्यरत आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी पूर्वेकडील बाजूची खिडकी कटरने कापून बँकेत प्रवेश केला. अत्यंत सराईतपणे चोरट्यांनी कटरच्या साह्याने स्ट्राँग रुममधील तब्बल 22 लॉकर्स फोडले. ग्राहकाचे लॉकरमध्ये असलेले सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड असा कोट्यावधींचा ऐवजही लंपास करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली.
दरम्यान, चोरट्यांनी चोरी करताना पकडले जाऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतल्याचे दिसून आले. बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडले. तसेच संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेला डीव्हीआर देखील सोबत नेला आहे. तर तपासात आपल्या हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हँडग्लोव्हजचा वापर चोट्यांनी केल्याचेही आता तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, याच बँकेत एका वर्षापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. तरीही सुरक्षेबाबतच्या त्रुटी कायम होत्या का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोरीची बातमी वार्यासारखी पसरताच बँक ग्राहकांनी शाखेबाहेर मोठी गर्दी केली होती. आपली आयुष्यभराची जमा पुंजी आणि दागिने चोरीला गेल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले होते.
या घटनेनंतर आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ठसे तज्ज्ञ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पाचारण केले आहे. आमदार गोपिचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उपअधीक्षक कल्पना बारवकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरिक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशीरापर्यंत पंचनामा आणि गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू होते.
बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्या- चांदीच्या नुकसान भरपाईबाबतचे धोरण स्पष्ट नसल्याने ज्यांचे लॉकर फुटले आहेत, ते ग्राहक हवालदिल झाले आहेत. पोलीस आता परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत.



Comments