उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांच्याकडून डॉ.गौरी च्या कुटुंबीयांचे सांत्वन
- Navnath Yewale
- Nov 27
- 3 min read
निष्णात, सक्षम वकिल देण्याचे अश्वासन; न्याय मिळवून देण्यासाठी वैयक्तीकरित्या पाठीशी असल्याची ग्वाही

बीड: विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांनी आज बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. पालवे कुटुंबीयांशी संवाद साधत डॉ. गौरी यांच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी डॉ. गोर्हे यांनी संवेदना व्यक्त केल्या. कुटुंबीयांच्या मनातील खल, वेदना आणि न्यायासाठी त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांनी डॉ. गौरीच्या कुटुंबीयांना न्यायासाठी पाठीशी असल्याची ग्वाही दिली. लवकर न्याय मिळवण्यासाठी निष्णात आणि सक्षम वकिलामार्फत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याचे अश्वासनही उपसभाती गोर्हे यांनी यावेळी दिले. कुटुंबीयांच्या भेटीनंतर उपसभापती गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिरुर कासार तालुक्यातील पिपंळनेर येथील डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांनी आत्महत्या प्रकरणावर संशय व्यक्त करत गर्जे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी 22 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, डॉ. गौरी यांची आत्महत्या नसून खूनच आहे असा संशय व्यक्त करत डॉ. गौरी च्या आई- वडिलांसह कुटुंबीयांनी गर्जे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. डॉ.गौरी च्या माहेरकडील नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या आहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गावी मोहोज-देवढे (ता. पाथर्डी) येथील घरासमोरच डॉ. गौरीच्या मृतदेहास मुखाग्नी दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मंत्री पंकजा मुंडे यांनी पालवे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेवून न्यायाचे अश्वासन दिले. आज (दि.27) विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी पालवे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेवून न्यायासाठी अवश्यक पाठपुराव्याची ग्वाही दिली.
पालवे कुटुंबीयांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. गोरे म्हणाल्या की, “डॉ. गौरी पालवे-गर्जे यांचा मुंबइृतील मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्या कुटुंबाने काही महत्वाची अतिरिक्त माहिती पोलिसांना द्यायची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांची नोंद झाली नव्हती. या तक्रारीची मी तत्काळ दखल घेऊन मुंबई पोलिसांशी तसेच स्थानिक पोलिस अधिकार्यांशी बोलले असून पुढील दोन-तीन दिवसांत अधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्व पुरवणी जबाबांची नोंद केली जाणार आहे”.
कुटुंबीयांनी आरोपीचे भाऊ अजय गर्जे आणि बहिण शीतल आंधळे यांनाही अटक करावी, अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गौरीला पूर्वी अनेकदा मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रकरणाचे मूळ कारण नीट समजून घेणे अत्यावश्यक असल्याचेही डॉ. गोन्हे यांनी नमूद केले.
“ उपसभापती म्हणून जबाबदारी आहेच, पण आई म्हणून हे प्रकरण मन हेलावून टाकणारं आहे. कुटुंबीयांना सक्षम सरकारी वकिल मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी मी स्वत: बोलणार आहे, तपासात कुठलाही दबाव सहन केला जाणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
न्यायप्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी पोलिसांना महत्वाचे निर्देश : तपासाच्या प्रगतीबाबत अधिकृत बुलेटीन दर दोन दिवसांनी पत्रकारांना देण्यात यावे, जेणेकरून अफवा आणि अप्रमाणित माहितीला आळा बसेल.
अशा संवेदनशील खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडितेवरच आरोप केले जातात, म्हणून संपूर्ण सुनावणीचे इन कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात यावी असे निर्देश डॉ. गोर्हे यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.
त्याचबरोबर नुकतेच तालुक्यातील एका गावात पोक्सो प्रकरणातील तक्रार नोंदवण्यात उशीर झाल्याबाबतही त्यांनी संबंधीत पोलीस अधिकार्यांकडून माहिती घेतली. “ महिलांविरुद्ध होणार्या गुन्ह्यांच्या तक्रारींची त्वरीत आणि गांभीर्याने नोंद होणे आवश्यक आहे. गावांमध्ये पोक्सो कायद्याबाबत जागृती वाढविण्यासाठी ग्रामसभा घेणे अवश्यक आहे, पोक्सो प्रकरणातील पीडित मुली आणि पालकांना तपासाच्या प्रगतीची नियमित माहिती देण्याबाबत भारतीय न्यायसंहितेतील नव्या तरतुदींची माहितीही डॉ. गोर्हे यांनी यावेळी दिली.
कुटुंबाला न्यायप्रक्रियेतील अडथळे आर्थिक मदत : गौरी पालवे- गर्जे यांचे आई-वडिल न्यायासाठी लढत असताना त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये, यााठी डॉ. निलम गोर्हे यांनी पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक ती आर्थिक मदत वैयक्तिक पातळीवर कुटुंबीयांना दिल्याचे त्यांनी सांगितले. “ न्याय मिळविण्यासाठी कोणतीही कमतरता राहू देणार नाही. कुटुंबाच्या पाठीशी मी वैयक्तिकरित्या उभी आहे, असेही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर गौरीच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी सरकार आणि पोलिस यंत्रणा तितक्यात कटाक्षाने काम करतील असा निर्धारही डॉ. गोर्हे यांनी यावेळी व्यक्त केला.



Comments