top of page

एफजीडी बंदीला शेतकरी–नागरिकांचा ठाम विरोध

 शेती व आरोग्यावर संकट!


ree

डहाणू : औष्णिक वीज प्रकल्पातील फ्लू गॅस डीसल्फरडायझेशन (एफजीडी) यंत्रणा बंद करण्यास शेतकरी, बागायतदार व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. औष्णिक वीज प्रकल्पातून कोळसा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुराबरोबर बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साइड (SO₂) नियंत्रित करण्यासाठी एफजीडी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, ही यंत्रणा बंद करण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका अदानी पॉवर कंपनीने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे सादर केली होती.


ree

बुधवारी डहाणू येथे या याचिकेवर जनसुनावणी झाली. या सुनावणीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी, बागायतदार आणि नागरिक उपस्थित होते. निवृत्त न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्रसिंग आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान शेकडो नागरिकांनी एफजीडी बंद करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत, ही यंत्रणा कायम ठेवण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार डहाणू परिसरात सल्फर डायऑक्साइड वायूची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एफजीडी यंत्रणा बंद झाल्यास या मर्यादेचे उल्लंघन होईल, याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले. तसेच, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.


शेतकऱ्यांनी सांगितले प्रदूषणामुळे शेती व फळांवर गंभीर परिणाम होत आहेत. चिकू फळ काळसर पडण्याचे प्रमाण वाढले असून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय नारळ, भाजीपाला, खाडीतील मासेमारी व इतर कृषी उत्पादनावरही परिणाम होत असल्याने एफजीडी युनिट बंद करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी केली.


ree

या वेळी आमदार विनोद निकोले यांनी भाष्य करताना, "परिसरातील प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने फसवणूक झाली आहे. औष्णिक वीज कंपनीने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्यावे," असे आवाहन केले.

तर, अदानी औष्णिक वीज प्रकल्पाच्या वतीने मांडण्यात आले की, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने एफजीडी बंद करणे आवश्यक आहे. मात्र, प्राधिकरणाने कंपनीला आदेश दिला आहे की, एफजीडी शिवाय प्रकल्प कार्यरत ठेवण्यापूर्वी हवेतील सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण किती आहे, याचा अहवाल सादर करावा.

 

 

  फ्लू गॅस डीसल्फरडायझेशन (एफजीडी) ही औष्णिक वीज प्रकल्पात वापरली जाणारी प्रक्रिया असून, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील सल्फर डायऑक्साइड (SO₂) सारख्या हानिकारक वायूंचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. यंत्रणा बंद केल्यास प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन श्वास घेणे देखील कठीण होईल, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

 


 

FGD प्लांटमुळे चिकू बागायत व शेतीला थेट धोका निर्माण झाला आहे. हा शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न असल्याने आम्ही ठाम मागणी करतो की हा प्लांट तातडीने थांबवावा आणि पर्यावरणपूरक, स्वच्छ पर्यायी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.

 मिहीर शाहा, माजी नगराध्यक्ष, डहाणू

Comments


bottom of page