एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश: आयएएस तुकाराम मुंडे यांच्याकडे एमपीएससी सचिवाची सुत्र

पुणे: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पुण्यातील एस.एम.जोशी पुलावर स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे, मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदा आंदोलक रोहित पवार यांच्याकडे सोपवला आहे. ज्यामध्ये आयएएस तुकाराम मुंडे यांच्याकडे एमपीएससी सचिवांची सुत्रे देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलकांनी एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्या लावून धरल्या आहेत. रविवारी (दि.11) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांचा एक मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे. हा मसुदा मंत्री भोसले यांनी रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. एमपीएससीच्या मुद्यावरून मागच्या 10 दिवसांपासून विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी हे आंदोल मागे घ्यावं यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मंत्री भोसले यांनी रोहित पवारांसह आंदोलकांची भेट घेऊन सरकारने मागण्यांसंदर्भात तयार केलेला मसुदा रोहित पवार यांच्यासह आंदोलकांना वाचून दाखवला. पण या मसुद्यामध्ये एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार याच्या राजीनाम्याबाबत उल्लेख नव्हता, त्यामुळे रोहित पवार यांनी पुन्हा एकदा विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
एमपीएससी परीक्षा पद्धतीतील गंभीर त्रुटी दूर कराव्यात, आयोगाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता आणावी आणि या कारभाराची जबाबदारी स्वीकारून एमपीएससी अध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
आंदोलक एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजिनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे आंदोलक आणि आयोजकांवर गुन्हे दाखल होऊ लागल्याने नवा वाद निमाृण झाला आहे. विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या करावाईनंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाले. आंदोलनात आपणही सहभागी असून भाषणं केली आहेत. मग विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होत असताना मला का वगळलं? असा प्रश्न उपस्थिती करत विद्यार्थ्याप्रमाणे माझ्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.
दरम्यान, रोहित पवार यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांवरही संताप व्यक्त केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे वागू नये, अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गरीब शेतकर्यांच्या विद्यार्थ्यांना दहशतवादी आणि गुप्तहेर ठरवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलन मागे घेण्याचा प्रश्न नाही, एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजिनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.



Comments