top of page

एलपीजीच्या ग्राहकांसाठी नविन नियम लागू; सिलेंडर घेण्यासाठी आता करावी लागणार बायोमेट्रिक पडताळणी

मुंबई: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण च्या युद्धामुळे जगभरात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. देशात गॅस तुटवडा निर्माण झाला असून घरगुती गॅस तुटवड्या बाबत ‘गॅस मिळणार का?’ पुरवठा बंद होणार का? अशा प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात घर केलं आहे. घराघरात गृहिणी गॅस जपून वापरत आहेत, तर दुसरीकडे हॉटेल आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर चिंतेचे ढग दाटले असतानाच, केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली आहे.


केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आता प्रत्येक ग्राहकासाठी एक अनिवार्य नियम लागू केला आहे, ज्याचा थेट संबंध तुमच्या गॅस कनेक्शनच्या वैधतेशी आहे. मंत्रालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे की, सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांनी ‘ बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन’ (ई-केवायसी) पूर्ण करणे आवश्यक आहे.


अनेकदा अशा कामांसाठी एजन्सीबाहेर तासनतास उभं राहावं लागतं, पण यावेही सरकारने दिलासा दिला आहे. घरी बसून करा व्हेरिफिकेशन, ग्राहकांना आता त्यांच्या घरात आरामात हे काम पूर्ण करता येईल. यासाठी तुम्हाला फक्त संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनीचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप आणि हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.


पश्चिम आशियातील युद्धात भारताच्या एकूण एलपीजी आयातीपैकी जवळपास 90 टक्के आयात ही ‘स्ट्रोट ऑफ होर्मुज’ मार्गे होते. मात्र, युद्धाच्या तणावामुळे हा मार्ग जवळपास बंद झाल्यासारखा आहे. यामुळे देशात पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी लोकांनी भीतीपोटी जास्तीचे सिलेंडर बुक करायला सुरुवात केली आहे. यामुळेच प्रत्यक्षात साठा असला तरी तुटवडा निर्माण झाला आहे.


दरम्यान, घरगुती वापरापेक्षा व्यावसायिक क्षेत्रावर याचा परिणाम जास्त गंभीर आहे. रेस्टॉरंट्स पूर्णपणे 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरवर अवलंबून असतात. ओव्हन, फ्रायर्स आणि ग्रिल्ससाठी या गॅसची मोठी गरज असते. पुरवठा अनियमित झाल्याने छोट्या खानावळी आणि हॉटेल्सना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मोठी रेस्टॉरंट्स चेन कशाबशा पद्धतीने आपले काम सुरू ठेवत आहेत, पण त्यांच्यावरही मर्यादा आल्या आहेत.


यामुळेच आता अनेक विक्रेते इंडक्शन किंवा इतर पर्यायांच्या शोधात आहेत. एकूणच, जागतिक परिस्थितीमुळे गॅसचा प्रश्न गंभीर होत असला, तरी सरकारने ई-केवायसी च्या माध्यमातून वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, आपले व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आणि गॅसचा वापर योग्य पद्धतीने करणे हाच सध्याचा उत्तम मार्ग आहे.

Comments


bottom of page