top of page

कबुतरखान्याच्या वाद पुन्हा पेटणार? जैन मुनी निलेशचंद्र आक्रमक; आता कबुतररक्षक तयार करणार !

मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर याचे पडसाद उमटू लागले आहेत. कबुतरखान्यायासाठी जैन समुदाय आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोरक्षकांप्रमाणे आम्ही आता कबुतररक्षक तयार करणार असल्याचे ते म्हणाले. कबुतरखाना बंदीमुळे एक लाख कबुतरांना प्राण गमवावे लगल्याचंही ते म्हणाले.


आज माध्यमांशी बोलताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. कबुतरखान्यासाठी निलेशचंद्र मुनी यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. निलेशचंद्र मुनी म्हणाले की, कबुतरखान्याचा मुद्दा हा जीवदयेशी संबंधित आहे. प्रत्येक इमरातीत जाऊन आम्ही जैन समाजाला संघटीत करत आहोत. दादर कबुतरखान्याजवळ आम्ही उपोषण करणार आहोत. जे प्राण्यांचा विचार करतात, त्यांनाच आम्ही मुंबई महानगरपालिकेत निवडून देणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईतील इमारतींमध्ये प्रवचन,जनजागृती करत आहोत असंही मुनी यावेळी म्हणाले.


दरम्यान, सरकारमध्ये जीव दया असती, तर दादर कबुतर खाण्यावरची ताडपत्री काढली असती. ‘बटोगे तो कटोगे’ असे योगीजी बोलतात. तुम्ही आमची तुलना मौलवींशी करू नका, एक लाख कबुतरे मृत्यूमुखी पडली आहेत. मात्र, सरकारने कोणतीही कमिटी स्थापन केली नाही. आमची विचारसरणी ही योगीजी आणि मोदीजी यांची विचारसरणी असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्यासोबत लोढा नव्हते आमच्यासोबत जैन समाज आहे. मी अमरावतीत राहतो, तिकडे घराघरात गाय कापतात. माझे 10 ते 15 गोरक्षक जखमी झाले आहेत. कोर्टाचा आदेश आहे धारावीची मशिद तोडायला हवी पण ती तोडली का तुम्ही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी कायदा हाता घेतला नाही. महाराष्ट्राचा सन्मान आम्ही राजस्थानी लोक अधिक करतो. तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे तर जा भेंडी बाजारात असे म्हणत त्यांनी विरोध करणार्‍यांना सुनावले.


आता गोरक्षका प्रमाणे कबुतररक्षक तयार करणार: मी कट्टर सनातनी जैन मुनी आहे. पुढच्या 15 दिवसांत उपोषणाला कधी बसणार ही तारीख निश्चित करणार असल्याचे त्यांनी म्हटले. हा धर्म आणि आस्था यांचा विषय असून मुख्यमंत्री देवेंद्र यांना विनंती करत आहोत. आम्ही जैन समाज नेहमी तुमच्यासोबत राहिलो आहे. पण आम्ही जीव दयेसोबत कोणतीही तडजोड करणार नाही, आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गोरक्षक आहेत तसे कबूतर रक्षक तयार करत करू अशी घोषणांही त्यांनी केली. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत ते कबूतर घेऊन येत असतात असेही जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले.

Comments


bottom of page