कष्टकर्यांचा तारणहार हरपला; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

पुणे: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आज सोमवारी निधन झाले. पुण्यातील पूना रुग्णालयात आढाव यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास धेतला. आढाव यांच्या निधनाने कष्टकर्यांचा तारणहार, सर्वसामन्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उपचारार्थ पुण्यातील पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र आज रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालावली.
डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव हे राज्यातील सामाजिक आणि श्रमिकांच्या चळवळीचे आधारस्तंभ मानले जायचे. ते सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकर्यांचे नेते होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषत: हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांच्या सन्मानासाठी समर्पित केलं. आढाव यांनी जातीय भेदभावाविरुद्ध ‘ एक गाव एक पाणवठा’ या चळवळीचंही नेतृत्व केलं. त्यांनी समजात समता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.
दोन दिवसांपूर्वी खासदार शरद पवार हे डॉ. बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. बाबा आढावांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, अशी सदिच्छा देखील पवारांनी व्यक्त केली होती.
आढाव यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. ‘बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत होते. शिव, फुले,शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग त्यांनी अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आमच्या ओंजळीत भरभरुन टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषत: रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते.
‘ बाबा आढाव हे सर्वांसाठी मोठा आधार होते. त्याच्या जाण्यामुळे सामाजिक चळवळींच्या आवकशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देश एका वैचारिक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवाव्रती नेतृत्वाला मुकला आहे. अशा शब्दात त्यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली.



Comments