top of page

खासदार संजय राऊतांचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान, भाजपलाही इशारा

मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठी अमराठीवादची भर पडली आहे. मराठी मुद्यावरून सुमारे 20 वर्षानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले यानंतर सुरुवातील बेस्टची निवडणुक आणि आता मुंबई मनपा निवडणुक एकत्र लढण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला आहे. मुंबई मनपा निवडणुकीतही ठाकरे बंधुंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आहे.


मुंबई उपनगरांसह लगतच्या परिसरात मराठी बोलण्याच्या मुद्यावरून मनसे आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मराठी न बोलल्यामुळे परप्रांतीयांना मनसैनिकांनी चोप दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मराठी- अमराठीचा वाद मुंबई मनपा निवडणुकीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच मराठी बोलण्यावरूनही आव्हान दिले आहे.

देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक भाषेला समान महत्व आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, त्या ठिकाणची भाषा तुम्हाला आली पाहिजे, असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. याबाबत संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मग मोहन भागवतांना सांगा की, मराठीत बोला. त्यांना जास्त कधी मराठीतून बोलतना ऐकले आहे का, मराठीत बोलायला हवे. तुमचे नाव भागवत आहे ना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठी केला पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे जा, ते हिंदीत बोलतात.


मुंबईत महापौर कोणाचा ही शंका असताच कामा नये. मुंबईत मराठीच महापौर होईल. पण आता भाजपाने सुरू केले आहे की, मुंबईचा महापौर हिंदू होईल. हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा सुरू केला हे लक्षात ठेवा. पण ही मुंबई मराठी आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी आरएसएस चे सरसंघचालक मोहन भागवत यांना आव्हान देत भाजपलाही इशारा दिला.

Comments


bottom of page