गणपती विसर्जन मिरवणूकीत भाजप -ठाकरे गट भिडले टिटवाळ्यात मिरवणूक पुढे-मागे नेण्याच्या कारणांवरुन धक्काबुक्की; 30 ते 40 जणांवर गुन्हे

कल्याण: गणपती विसर्जन मिरवणूक पुढे- मागे घेण्याच्या कारणांवरून टिटवाळ्यात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रुपांतर कार्यकर्त्यांमधील बाचाबाची आणि झटापटीत झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या गरसेविका उपेक्षा भोईर आणि ठाकरे गटाचे सुरेश भोईर यांच्या घरगुती गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असताना हा वाद झाल्याची माहिती आहे. मिरवणूक पुढे कोणाची आणि मागे कोणाची, यावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्या येत आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरा-समोर आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
या प्रकरणी कल्याण पोलिसांनी शक्तिवान भोईर, नगरसेविका उपेक्षा भोईर, प्रदिप भोईर, सुरेश भोईर यांच्यासह दोन्ही गटांतील सुमारे 30ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम, श्रीकृष्ण हॉस्पिटल रोड, एमएनएस चौक आणि स्टेशन रोड परिसरात हा प्रकार घडला. गणपती विसर्जनासाठी निघालेली मिरवणूक पुढे - मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला. सुरुवातील दोन्ही बाजूंनी शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. त्यानंतर वाद वाढत जाऊन दोन्ही गटांतील व्यक्तीमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचा अरोपही करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या वाद्यवृंद वाजविण्याच्या नियमांचे उल्लंघन तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
शक्तिवान भोईर आणि उपेक्षा भोईर यांच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता अडवण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 194,126,223 आणि 33(1)(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई योगेश भोलानाथ निर्मळ यांनी सुमोटो फिर्याद दिली असून सहाय्यक पोलिस निरिक्षक काळे पुढील तपास करीत आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या या वादामुळे टिटवाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची नेमकी पार्श्वभूमी, सहभागी व्यक्तींची भूमिका आणि नियमभंगाच्या बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.



Comments