गणिताचा 'ग्यानबा' अन् साहित्याचा 'कार्तिक'; पिंपळनेरचा झेंडा राज्याच्या साहित्याच्या दरबारी!
- Navnath Yewale
- Dec 30, 2025
- 1 min read
मातृत्वाचे छत्र हरपलेल्या कार्तिकची देवगिरी राज्यस्तरीय स्पर्धेत गरुडझेप; गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जिद्दी विद्यार्थ्याने मिळवले यश.

छत्रपती संभाजीनगर: प्रतिकूल परिस्थिती आणि वैयक्तिक दु:खावर मात करत जिद्दीच्या जोरावर आभाळ कवेत घेता येते, हे कार्तिक कांबळे या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. देवगिरी महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित ४७ व्या 'कै. विनायकरावजी पाटील स्मृती समारोह २०२५' अंतर्गत पार पडलेल्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत कार्तिकने द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या लेखणीचा डंका वाजवला. २९ व ३० डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने हे घवघवीत यश संपादन केले.

साहित्यिक जडणघडण अन् गुरूची पारख:
कार्तिकमधील उपजत कवी आणि वक्ता यांचा शोध २०२१-२२ मध्ये लागला. राष्ट्रीय गणित दिनाच्या कार्यक्रमात त्याने केलेले प्रभावी सूत्रसंचालन, त्याचे धाडस आणि शब्दांची फेक पाहून मी प्रभावित झालो होतो. त्याच्यातील ही साहित्यिक ठिणगी ओळखली आणि त्याला 'एकता साहित्य संमेलन, आर्वी' येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. तिथूनच त्याच्या काव्यप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
संघर्षाची अग्निपरीक्षा:
कार्तिकचा हा विजय प्रेरणादायी आहे, कारण आईचे छत्र हरवलेले असतानाही त्याने हार मानली नाही. स्वतःचा खर्च पेलण्यासाठी तो एका हॉस्पिटलमध्ये 'पार्ट-टाइम जॉब' करतो. काल स्पर्धेच्या दिवशी त्याची ड्युटी असताना, त्याची संधी हुकू नये म्हणून त्याच्या हॉस्पिटलमधील कामाच्या ठिकाणी मी स्वतः त्याच्या जागी काम केले आणि त्याला स्पर्धेसाठी मार्गस्थ केले. याकामी डॉ. उदय बारगजे, कॉलेजच्या शिक्षक प्रोफेसर डॉ.धर्मपाल घुमारे सर यांनी कार्तिकला या स्पर्धेत नेले सरांनी देखील मोठ्या मनाने सहकार्य व प्रोत्साहन दिले.

'पिंपळनेर पॅटर्न': ४५ दिवसांची मोफत कार्यशाळा:
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मी मागील वर्षी पिंपळनेर गावातील पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांची मोफत उन्हाळी कार्यशाळा आयोजित केली होती. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत चालणाऱ्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणाखाऊची सोयही मी स्वतः केली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी ४६० इंग्रजी शब्द पाठांतर करण्यासोबतच साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रातील धडे घेतले. प्रामुख्याने गणित भाग १ व २ या विषयात माझे विद्यार्थी दरवर्षी ९० पेक्षा जास्त गुण मिळवतातच.
"कार्तिकच्या या यशाने माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. भविष्यात पिंपळनेर गावातील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच स्पोर्ट, साहित्य, क्रीडा आणि कला या सर्व गुणांनी केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात चमकल्याशिवाय राहणार नाहीत, असा मला ठाम विश्वास आहे."
सी. पी. पालवे (शिक्षक व मार्गदर्शक)



Comments