top of page

गिरगावात आगळीवेगळी गृहनिर्माण संस्था...

विजयश्री'कडून रहिवाशांना चक्क बोनस वाटप

ree

मुंबई : गिरगावातल्या तात्या घारपुरे पथावर असलेल्या विजयश्री सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून मोबाईल टॉवर आणि इतर माध्यमातून देखभाल आणि व्यवस्थापनातून जमा होणाऱ्या वाढीव रक्कमेतून तब्बल ५५ रहिवाशांना प्रत्येक कुटुंबामागे ६ हजार रुपयांचा घवघवीत दिवाळी बोनस वाटप करण्यात आला. प्रत्येक रहिवाशाचे आर्थिकदृष्ट्या तोंड गोड करण्याचे विशेष काम या संस्थेने केल्याने, ही संस्था चर्चेत आली आहे. या बोनस वाटप कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप नाईक, माजी नगरसेविका अनुराधा पोद्दार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष श्रीधर जगताप, विजयश्री सोसायटीचे कार्यकारणी व असंख्य रहिवाशी उपस्थित होते.


यावेळी बोलताना जगताप यांनी विजयश्री गृहनिर्माण संस्था रहिवाशांना दिवाळी बोनस देणारी मुंबईतील एकमेव संस्था असल्याचे आवर्जून नमूद केले व संस्थेच्या कार्यकारिणीचे सेक्रेटरी विजय चाळके यांचे विशेष कौतुक केले. तसेच इमारतीच्या अभिहस्तांतरणाबाबत भाजप विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेतला असून इमारतीचे अभिहस्तांतरणाबाबत व इतर तक्रारीचे निवारण म्हाडा कार्यालयात दरेकर ह्यांची लवकरच भेट घेऊन सर्व प्रश्नन मार्गी लावण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले.


माजी नगरसेविका अनुराधा पोद्दार यांनी आपल्या भाषणात दिवाळी सण व त्या निमित्ताने सर्व सभासदांना मिळणारा बोनस हा दुग्ध शर्करा योग व आनंदायी क्षण असून संस्थेच्या कार्यकारिणीचे कौतुक केले. तसेच उपस्थित महिलांना आपले घरगुती काम प्रापंचिक समस्या इत्यादी बाबत पुराणातील उदाहरण देऊन समस्येवर मात करून सुखी समाधानी जीवन कसे जगता येईल याबद्दल अनुराधा पोद्दार यांनी महिलाना मार्गदर्शन केले.


शिवसेना माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी संस्थेचा कारभार मागील कित्येक वर्ष आपण जवळून पहात असून त्यात कुठेही खंड पडलेला नाही व उत्तरोत्तर संस्थेची भरभराट होताना पाहून आनंद वाटतो. त्यात काही वर्षापासून सभासदांना दिवाळी बोनस देणे खर्चाचे नियोजन करून रहिवाशांना मेंटेनन्स बिलाचा जादा भार न टाकता दिलासा देणे संस्थेचा कारभार नीटनेटका चालवणे याबाबत संस्थेचे सेक्रेटरी चाळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करून सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.  


संस्थेचे लेखापाल मनीष हळदणकर यांनी संस्थेचा लेखाजोखा, पत्रव्यवहार, वार्षिक अंदाजपत्रक व त्यानुसार संस्थेचे आर्थिक गणित सांभाळून संस्थेचा कारभार चालवणारी सर्वोत्कृष्ट संस्था असून अशा संस्थेचे अनुकरण करण्याबाबत इतर गृहनिर्माण संस्थांना विजयश्री संस्थेचे उदाहरण आपण नेहमी देत असल्याचे सांगितले. त्यांनी सेक्रेटरी व कार्यकारिणीचे तसेच सर्व सदस्यांचे कौतुक केले व सर्व सभासदांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Comments


bottom of page