top of page

गेवराईत येऊन हाकेंनी पुन्हा दंड थोपाटले!

पोलिसांच्या प्रतिबंधात्मक नोटीसीला न जुमानता हाकेंचे शक्तिप्रदर्शन



बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडीत यांच्या समर्थकांमध्ये 26 ऑगस्ट रोजी जोरदार राडा झाला होता. हाके आपल्या समर्थकांसह गेवराईतून जात असताना पंडित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली होती. त्यानंतर आक्रमक हाकेंनी गाडीतून बाहेर येत दंड थोपाटून पंडित समर्थकांना आव्हान दिले होते. त्यानंतर आज पुन्हा गेवराईत त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. तसेच दंड थोपटत त्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना आव्हान दिले आहे.


गेवराईत हाके यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. हाके- पंडित यांचे समर्थक पुन्हा आमने सामने आले तर मोठा राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत गेवराई शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले. काही दिवसांपूर्वी गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता.


छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच लक्ष्मण हाके यांनी दंड थोपटत वज्रमुठ दाखवली. बाग पिंपळगाव आणि रेवकी देवकी या दोन्ही ठिकाणी लक्ष्मण हाके यांची सभा आयोजीत करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवला होता. एवढेच नाही तर मुंबईच्या आझाद मैदानात जाऊन उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतली होती.


आंदोलनापूर्वी आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य झाल्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराईत बॅनरबाजी केली आहे. आधी आंदोलनाच्या समर्थनात तर आता मागण्या मान्य केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे आभार व्यक्त करणारे बॅनर गेवराईत सर्वत्र लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमिवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह शेकडो समर्थक, कार्यकर्त्याऐनी रॅली आणि सभा यामुळे गेवराईतले वातावरण तापले आहे.


ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले असून घोषणाबाजी करत दंड थोपटून आव्हान देताना दिसत आहेत. याआधी 26 ऑगस्ट रेाजी पंडित आणि हाके समर्थकांमध्ये गेवराईत तुफान राडा झाला होता. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जाणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बाजावली असतानाही ते गेवारईत दाखल झाले आहेत.


हाके समर्थकांकडून वाल्मीक कराडचा जयघोष

ओबीसी नेते लक्ष्मण हाके बीड जिल्हा दौर्‍यावर आहेत, हाके यांच्या स्वागतासाठी एकवटलेल्या समर्थकांकडून बीडच्या मांजरसुंबा चौकात जोरदार घोषणाबाजी करत रस्ता आडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच बरोबर मस्साजोगचे सरपंच स्व. सतोष देशमुख यांच्या कृ्रर हत्ये प्रकरणी कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड याच्या समर्थनात हाके समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. ‘वाल्मीक आण्णा अंगार है, बाकी सब भंगार है’, वाल्मीक आण्णा आगे बढो, हम तुम्हारे साथ है. असी घोषणाबाजी करत हाके समर्थकांकडून रस्ता आडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Comments


bottom of page